आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्र शासनाच्या भांडवलीखर्चासाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांना बिनव्याजी कर्ज देण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या नगररचना विभागामार्फत या योजनेची प्रक्रिया राबविण्यात येत असून, या अंतर्गत व्यापारी संकुले व मनपाची नवीन इमारत उभारण्यासाठी प्रस्ताव करण्यात आला आहे. येत्या चार दिवसात हा प्रस्ताव नगररचना विभागाच्या संचालकांकडे सादर करण्यात येणार आहे.
महापालिका प्रशासनाने या योजनेतून प्रोफेसर कॉलनी चौकातील व्यापारी संकुल व सावेडी येथील जुन्या एनसीसी कार्यालयाच्या जागेवर नवीन व्यापारी संकुल उभारण्याचा प्रस्ताव केला आहे. तसेच महापालिकेची मुख्य इमारत अपुरी पडत असल्याने मुख्य इमारतीच्या मागील बाजूस नवीन इमारत उभारणे, जुन्या महापालिकेच्या इमारतीचे व कौन्सिल हॉलचे नूतनीकरण करणे आदी कामे पहिल्या टप्प्यात प्रस्तावित केली जाणार आहेत.
त्यासाठी या चारही इमारतींचे प्रस्तावित नकाशे, इमारत बांधणीसाठी येणारा अंदाजे खर्च आदींचा एकत्रित प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. या चारही प्रकल्पासाठी सुमारे ११८ कोटी किंवा त्यापेक्षा अधिक खर्च येऊ शकतो. आज (शुक्रवारी) जळगाव येथे या अहवालाचे प्राथमिक सादरीकरण केले जाणार आहे. तर १० जानेवारीला पुणे येथे नगररचना विभागाच्या संचालकांकडे अहवाल सादर केला जाणार आहे.
उत्पन्न वाढीसाठी प्रकल्प
महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी व्यापारी संकुल उभारणे आवश्यक आहे. त्यामुळे दोन व्यापारी संकुलांसह मनपाच्या दोन इमारतींसाठी बिनव्याजी कर्ज मिळावे, यासाठी प्रस्ताव करण्यात येत आहे. प्रारूप प्रस्ताव तयार करण्यात आला असून, तो सादर केला जाणार आहे. त्याला मंजुरी मिळाल्यास अंतिम अहवाल केला जाणार आहे.'' -डॉ. पंकज जावळे, आयुक्त.
सावेडी येथे नवीन व्यापारी संकुल : ३४.१४ कोटी
सावेडी येथे जुन्या एनसीसी कार्यालयाच्या जागेत नवीन व्यापारी संकुल प्रस्तावित करण्यात येणार आहे. तत्कालीन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी या संकुलाच्या उभारणीची घोषणा केली होती. २५९१ चौरस मीटर जागेत तीन मजली संकुलाच्या इमारतीसाठी अंदाजे ३४.१४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. इमारतीचे प्रारूप नकाशेही तयार करण्यात आले आहेत.
नवीन इमारत व कौन्सिल हॉल नूतनीकरण : ४६ कोटी
महापालिकेच्या मुख्यालयातील जागा अपुरी पडत असल्याने या मुख्यालया मागील उपलब्ध असलेल्या जागेत नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव करण्यात आला आहे. त्यासाठी सुमारे ३४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच, मनपा कार्यालयाचे व कौन्सिल हॉलचे नूतनीकरण करण्यासाठीची अर्थसहाय्य मिळण्याची मागणी मनपाकडून केली जाणार आहे. त्यासाठी सुमारे १२ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या दोन्ही प्रकल्पांसाठी सुमारे ४६ कोटी खर्च अपेक्षित आहे.
प्रोफेसर कॉलनी व्यापारी संकुल : ३७.७४ कोटी
प्रोफेसर कॉलनी चौकातील व्यापारी संकुलाच्या जागेत छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा व तीन मजली व्यापारी संकुल असा प्रस्ताव करण्यात आला आहे. ४२६१ चौरस मीटर म्हणजे जवळपास एक एकर ही जागा आहे. इमारत उभारणीसाठी अंदाजे ३७.७४ कोटी खर्च अपेक्षित आहे. या व्यापारी संकुलासाठी शेजारीच सुरू असलेल्या नाट्यगृहाच्या शिल्लक असलेला एफएसआय वापरण्याचा निर्णय यापूर्वीच झालेला होता. त्यामुळे बहुमजली इमारत उभारता येणे शक्य आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.