आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुसळधार पाऊस:मनपा उपायुक्त डांगे म्हणतात, घरच उचला

नगर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुसळधार पावसामुळे शहरातील विविध भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानंतर शुक्रवारी झालेल्या महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत ओढे नाले बुजवून त्यावर झालेल्या बांधकामांचा प्रश्न चांगलाच गाजला. त्यात उपायुक्त यशवंत डांगे यांनी ‘ज्या भागात कायम पाणी शिरते, त्या भागातील नागरिकांनी आपल्या घरांच्या प्लिंथ उचलून घ्याव्यात’ असा सल्ला दिला. याची मनपा वर्तुळात चांगली चर्चा रंगली होती.

सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा पार पडली. बुजविण्यात आलेले ओढे - नाले व त्यावरील बांधकामे, अर्धवट झालेली नालेसफाई या मुद्द्यांवरून सभापती वाकळे, नगरसेवक मुदस्सर शेख, विनीत पाऊलबुद्धे, राहुल कांबळे, रूपाली वारे, रवींद्र बारस्कर आदींनी प्रशासनाला धारेवर धरले. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचे सभेत वाभाडे काढण्यात आले.

सावेडी उपनगर परिसरातील अनेक भागात ओढे-नाले बुजवून त्यावर लेआउट मंजूर करण्यात आले. इमारतीची बांधकामे करण्यात आली. त्यामुळे पाणी वाहून जाण्यास जागा उरली नाही. परिणामी, अनेक वसाहतींमध्ये पाणी शिरले. नगरसेवक पाऊलबुद्धे व रुपाली वारे यांनी या मुद्द्यावरून नगररचना विभागाला जाब विचारला. मात्र, त्यावर कोणतेही ठोस कारण देता आले नाही.

उपायुक्त यशवंत डांगे यांनी या मुद्द्यावर बोलताना भौगोलिक परिस्थितीमुळे त्या भागात पाणी साचत आहे, ज्या भागात कायम पाणी साचते, त्या भागातील नागरिकांनी आपल्या घरांच्या प्लिंथ उचलून घ्याव्यात, तशा सूचना त्यांना द्याव्यात, असा सल्ला आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख शंकर मिसाळ यांना दिला. त्यावर नगरसेविका वारे यांनी गेल्या २० वर्षांपासून नागरिकांची तिथे घरे आहेत, गेल्या दोन-चार वर्षांपासून हा प्रश्न निर्माण झाल्याकडे लक्ष वेधत डांगे यांना प्रत्युत्तर दिले. मात्र, त्यानंतर हा विषय गुंडाळण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...