आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:अतिक्रमणावर पालिकेचा हातोडा; कोपरगाव बसस्थानक परिसराने घेतला मोकळा श्वास, अनेकांची नाराजी

कोपरगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोपरगाव नगरपालिकेच्या प्रशासनानाची नजर अचानक शहरातील अतिक्रमणावर पडली आणि काही समजण्याच्या आत पालिकेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी पालिकेची फौज शहरातील अतिक्रमणे काढण्यासाठी रस्त्यावर उतरवली. बुधवारी दुपारी एक वाजता अचानक पोलिस निरीक्षक वासुदेव देसले व त्यांचे पोलिस कर्मचारी पालिकेच्या फौजफाट्यासह मुख्याधिकारी गोसावी हे बसस्थानक परिसरात आले. रहदारीला अडथळा होणाऱ्या हातगाड्या बाजुला करून अतिक्रमणे काढली.

कोपरगाव शहरातील वाढत्या अतिक्रमणाने अनेक दिवसांपासून आडचणी वाढल्या होत्या. ६ एप्रिल रोजी कोपरगाव शहरातील नव्याने बांधलेल्या पोलिस स्टेशन व बसस्थानक इमारतीचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री दिलीप वळसे यांच्या हस्ते होणार असल्याने त्यांच्या ताफ्याला आडचण येऊ नये म्हणून बसस्थानक परिसर व रस्त्याच्या कडेच्या हातगाड्या बाजुला करता करता अचानक अतिक्रमण काढण्याचा सपाटा पालिका प्रशासनाने सुरू केला आणि बघता बघता बसस्थानक परिसरातील अनेक दुकाने, टपऱ्या, हातगाड्याने व्यापलेला परिसर रिकामा केला. सायंकाळी उशिरापर्यंत अतिक्रमण काढण्यासाठी पालिकेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी, आरोग्य विभागाचे प्रमुख सुनील आरण यांच्यासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह ८० कर्मचारी, पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्यासह १० पोलिस कर्मचारी, जेसीबी, ट्रॅक्टर, इतर अनेक वाहनांच्या ताफ्यासह संपूर्ण यंत्रणा शहरातील अतिक्रमणे काढण्यात मग्न होती. ही मोहीम संपूर्ण शहरातील अतिक्रमणे काढेपर्यंत राबवणार असल्याची माहिती मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी दिली. मुख्य रस्त्यावर अतिक्रमणे वसली आहेत, तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याच्या पाठीमागे रस्ता पुन्हा अतिक्रमणाने व्यापला आहे. येवला रोड, साईबाबा तपोभूमी, पाण्याच्या टाकीचा परिसर अतिक्रमण धारकांनी काबिज केल्याने शहराचे भकास रूप दिसत आहे. येत्या काही दिवसात नागरिकांनी स्वत: होऊन आपले अतिक्रमण काढून घ्यावेत, अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा मुख्याधिकारी गोसावी यांनी दिला.

शहरातील सर्व अतिक्रमणे काढण्याचा मुख्याधिकाऱ्यांचा इशारा

अतिक्रमणधारक धास्तावले
कोपरगाव शहरातील अतिक्रमणे वाढवण्यात व बेकायदेशीर कामे करण्यात बहुतांश राजकीय मंडळी आहेत. आजी-माजी नगरसेवक, नगराध्यक्ष, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांनी शहरात अतिक्रमणे करून ती गरजू व्यवसायिकांना अव्वाच्या सव्वा दराने मासिक भाड्याने देऊन स्वतःच्या उत्पन्नाचे साधने निर्माण केले. शासनाच्या या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेने राजकीय पदाधिकारी धास्तावले आहेत.

बातम्या आणखी आहेत...