आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • Municipal Solar Power Plant Not Getting Energy; An Ambitious Project Of Rs 6.80 Crore Proposed Under Amrit Abhiyan Has Been Stalled For Six Months| Marathi News

दिव्य मराठी विशेष:मनपाच्या सौरऊर्जा प्रकल्पाला मिळेना ऊर्जा; अमृत अभियानांतर्गत प्रस्तावित 6.80 कोटी रुपयांचा महत्वाकांक्षी प्रकल्प सहा महिन्यांपासून ठप्प

मयूर मेहता | नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेमधील उपसा पंपाच्या वीज बिलात बचत होण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या अमृत अभियानांतर्गत महापालिकेला सौर ऊर्जा प्रकल्पासाठी ६.८० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. १.६ मेगावॅट विजेची निर्मिती यातून होणार आहे. विविध दहा ठिकाणी या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असूनही गेल्या सहा महिन्यांपासून काम ठप्प झाले आहे.

नगर शहरात पाणी वितरणासाठी पाणी योजनेवरील उपसा पंपाद्वारे पाणी उचलले जाते. तसेच टाक्यांमधून पाणीपुरवठा करण्यासाठीही अनेक ठिकाणी संपवेलमधून सतत मोटारीद्वारे पाणीपुरवठा सुरु असतो. यासाठी दरमहा सुमारे २ कोटी रुपये वीज बिलावर खर्च होतात. या वीजबिलाचा खर्चात बचत व्हावी यादृष्टीने केंद्र सरकारने पाणीपुरवठा योजनेसाठी निधी मंजूर करताना सौर ऊर्जा प्रकल्पासाठी ही पावणेसात कोटी रुपयांचा निधी दिला आहे. महावितरण व महाऊर्जाच्या नेट मीटरिंग धोरणाअंतर्गत महापालिकेचे उपसा पंप असलेल्या ठिकाणी या छोट्या छोट्या प्रकल्पांची उभारणी सुरू आहे.

या सर्व प्रकल्पांची क्षमता १.६ मेगावॅट आहे. महापालिकेने निर्मिती केलेल्या विजेचा वापर त्यांच्याच उपसा पंपासाठी व्हावा, हा यामागचा उद्देश आहे. हैदराबाद येथील प्रीमियर सोलर सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला प्रकल्प उभारणीचे काम देण्यात आले आहे. महाऊर्जा मार्फत व त्यांच्या देखरेखीखाली या प्रकल्पाची उभारणी होऊन तो महापालिकेकडे हस्तांतरित केला जाणार आहे. प्रकल्प उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात असून विद्युतीकरण व इतर किरकोळ कामे सहा महिन्यांपासून प्रलंबित आहेत. कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेला हा प्रकल्प सध्या धूळखात पडून आहे.महाऊर्जासह महापालिकेचेही याकडे दुर्लक्ष होत आहे.

पदाधिकारी, लोकप्रतिनिधींना पडला विसर
केंद्र सरकारकडून प्रकल्पासाठी निधी मंजूर झाल्यानंतर निविदा प्रक्रिया मार्गी लावण्यासाठी पदाधिकारी लोकप्रतिनिधींकडून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. मात्र, प्रत्यक्षात महाऊर्जामार्फत त्याचे काम होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पदाधिकारी व लोकप्रतिनिधींना या प्रकल्पाचा सोयीस्कर विसर पडल्याचे चित्र आहे. मनपा प्रशासनाचे अधिकारी यासाठी पाठपुरावा करत असताना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी मात्र याकडे दुर्लक्ष करत आहेत.

तांत्रिक अडचणींमुळे कामाला विलंब
सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम महाऊर्जा मार्फत व त्यांच्या देखरेखीखाली खाजगी संस्थेकडून सुरू आहे. प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, या कामात काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या. यासंदर्भात नुकतीच ठेकेदार संस्था व महाऊर्जाच्या अधिकाऱ्यांची बैठकही झाली आहे. अडचणीतून मार्ग काढून प्रकल्पाचे उर्वरित काम लवकरच मार्गी लागेल.''- परिमल निकम, जल अभियंता, मनपा.

सौरऊर्जा प्रकल्पाची सुरक्षा वाऱ्यावर
महापालिकेचे उपसा पंप असलेल्या दहा ठिकाणी सदरचे प्रकल्प उभारण्यात आले आहेत. शहरात पाण्याच्या टाक्या असलेल्या ठिकाणी प्रकल्पांची उभारणी झालेली आहे. मात्र, अद्याप तो महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आलेला नाही. बहुतांशी टाक्यांच्या ठिकाणी संरक्षण भिंतीचीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. सामान्य नागरिकांचा या प्रकल्पाच्या ठिकाणी वावर असतो. त्यामुळे या प्रकल्पाची सुरक्षा सध्या वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे.

बातम्या आणखी आहेत...