आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:बनावट दस्तावेज करून प्लॉटची परस्पर विक्री ; चौघांविरोधात कोतवालीत गुन्हा दाखल

नगर3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खरेदीखताचा बनावट दस्ताऐवज बनवत खोट्या कागदपत्रांच्या आधारे वृद्धाच्या प्लॉटची परस्पर विक्री झाल्याची घटना नागरदेवळे (ता. नगर) येथे घडली. या प्रकरणी चार जणांविरूद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अर्जुन जगन्नाथ बंगाळ (वय ७५, रा. सहकारनगर, पुणे) यांनी फिर्याद दिली. रिझवान ईस्माइल सय्यद, शेख इम्रान, सय्यद मुजाहिद (सर्व रा. भिंगार, अहमदनगर), अ‍ॅड. तनवीर महेमुद शेख (रा. गोविंदपुरा, नगर) व फिर्यादीच्या जागी खरेदीसाठी उभा केलेला बनावट इसम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी बंगाळ यांच्या मालकीचा नागरदेवळे येथे १४२.४४ चौरस मीटर बिनशेती लेआऊट मंजूर झालेला प्लॉट आहे. गेल्या अनेक वर्षापासून बंगाळ पत्नीसह पुणे येथे राहत असून १५ जून रोजी ते प्लॉटला भेट देण्यासाठी नागरदेवळे येथे आले होते. त्यावेळी त्यांच्या मालकीच्या प्लॉटवर दुमजली इमारतीचे बांधकाम झाल्याचे निर्दशनास आले.

फिर्यादी बंगाळ यांनी विचारपूस केली असता त्याने बिल्डरच्या ऑफिसमध्ये जायला सांगितले. बिल्डर अली अकबर, अस्लम खान आणि शोएब शेख यांनी ४ वर्षांपूर्वी प्लॉट मालकाकडून विकत घेऊन आम्हाला विकला, असे सांगितले. त्यानंतर बिल्डर अली अकबर याला विचारणा केली असता मी चौकशी करून तुमची अडचण सोडवून देतो, असे सांगून बोळवण केली. आरोपी रिझवान सय्यद याने बंगाळ यांचे नाव खरेदीखतामध्ये नमूद करत बंगाळ यांच्याऐवजी डमी माणूस उभा करून खरेदीखत करून घेतले. या खरेदीचा दस्ताऐवज तत्कालीन सह दुय्यम निबंधक यांच्यासमोर आरोपी इम्रान शेख याच्या मदतीने करण्यात आला. या दस्ताऐवजावर लिहून देणाऱ्याचा पत्ता डिग्रस (ता. राहुरी) असा असून आधारकार्ड विना हा व्यवहार करण्यात आला. दस्तऐवज आणि त्यावर साक्षीदार म्हणून इम्रान शेख आणि मुजाहिद सय्यद यांनी लिहून देणार आणि घेणार यांच्या नावासमोर सह्या करत बंगाळ उपस्थित नसताना त्यांचा अंगठा घेतल्याचे भासवले. या खरेदीच्या दस्ताऐवजावर अ‍ॅड. शेख यांनी सही करत साक्षीदारास ओळखतात असे नमूद केले. आरोपींनी २६ डिसेंबर २०१७ रोजी बनावट खरेदीखत बनवून फिर्यादी बंगाळ यांची फसवणूक केली.

बातम्या आणखी आहेत...