आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाविकास आघाडीने निमंत्रण दिले तर आम्ही त्यांच्यासोबत जायला तयार आहोत, मात्र आघाडीला एमआयएमची मते हवी आहेत, एमआयएमचे नेतृत्व नको आहे, अशी दुटप्पी भूमिका चालणार नाही, असे स्पष्ट मत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी नगरमध्ये बोलताना व्यक्त केले. छत्रपती संभाजीनगरकडून पुण्याकडे जाताना खासदार जलील नगरमध्ये थांबले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
खासदार जलील म्हणाले, महाविकास आघाडीत काँग्रेसला राहुल गांधी यांचे नेतृत्व हवे आहे. राष्ट्रवादीला शरद पवारांचे नेतृत्व हवे आहे. मग आमच्या पक्षाला आघाडीत आमचे नेतृत्व का नको, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. एखाद्या चित्रपटाचे प्रमोशन थेट देशाचे पंतप्रधान करतात हे विचार करायला लावणारे आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत ''द काश्मीर फाईल'' चित्रपट येतो. कर्नाटकच्या निवडणुकीत ''द केरला स्टोरी'' चित्रपट येतो. हे केवळ जाती-धर्मात तेढ निर्माण करून निवडणुका जिंकण्याचे प्रयत्न आहेत, असा आरोपही खासदार जलील यांनी केला. मात्र कर्नाटकच्या निकालातून जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
कालिचरण महाराजांकडून होणाऱ्या प्रक्षोभक वक्तव्याबद्दल खासदार जलील यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले, अनेकजण भगवे कपडे घालून साधू होतात, मात्र त्यांच्याबद्दल समाजात आदर असतो, असे नाही. भगवे कपडे घालणाऱ्यांनी तोंड उघडले की ते गरळ ओकतात. पोलिस, सरकार आणि प्रशासन यांनी जर आपले काम व्यवस्थित केले, तर कालिचरण महाराजांसारखे भगवे कपडे घातलेले जेलमध्ये असतील. अन्यथा आम्हाला पोलिसांनी परवानगी द्यावी, आम्ही कालीचरण महाराजांना योग्य भाषेत उत्तर देऊ, असाही इशारा त्यांनी दिला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.