आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगरचा कोरोना पॉझिटिव्ह रेट वर्षभरानंतर प्रथमच १.०४ टक्क्यांवर आला आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात पॉझिटिव्ह रेट १९.८५ टक्के होता. लसीकरणामुळे प्रथमच पॉझिटिव्ह रेट १८ टक्क्यांनी कमी झाला आहे. सरकारी व खासगी रुग्णालयांत उपचारासाठी दाखल होणारे रूग्ण देखील पूर्णपणे घटले आहेत.
नगरमध्ये मार्च २०२० मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. कोरोना सुरू झाल्यानंतर नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचे लाळेचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येत होते. त्यानंतर दोन किंवा तीन दिवसानंतर त्याचा अहवाल प्राप्त व्हायचा. तोपर्यंत नमुने दिलेल्यामधील अनेक जण बिनधास्तपणे बाहेर फिरायचे त्यामुळे संसर्ग आणखी वाढायचा. त्यामुळे नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रथमच कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुरू करण्यात आली. पहिल्या टप्प्यात ८०० नमुने तपासण्याची या प्रयोगशाळेची क्षमता होती. सातत्याने रुग्ण वाढ झाल्यानंतर त्याची क्षमता ३ हजार व पुढे सहा हजार करण्यात आली.
दुसऱ्या लाटेत एप्रिल व मे महिन्यात कोरोनाने आणि उच्चांक गाठला होता. त्यावेळी दररोज या प्रयोगशाळेमध्ये पाच ते साडे सहा हजार लाळेच्या नमुन्याची तपासणी केली जात होती. गेल्या महिन्याभरापासून रुग्ण संख्या घटल्यामुळे चाचण्या देखील घटल्या आहेत. सध्या दररोज जिल्हा शासकीय रुग्णालय, खाजगी हॉस्पिटल मध्ये ८०० जणांची चाचणी होते त्यापैकी पॉझिटिव्ह येणाऱ्यांचे प्रमाण अगदी नगण्य आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात नगरचा पॉझिटिव्ह रेट १९.८५ टक्के होता. आता वर्षभरानंतर मे महिन्यात पॉझिटिव्ह रेट प्रथमच १.०४ टक्क्यांवर आला आहे.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या घटली
नगर शहर व जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या गेल्या पाच महिन्यांपासून घटत आहे. महिन्याभरात तीन वेळा पॉझिटिव्ह रुग्ण संख्या शून्यावर आली होती. बुधवारी नगर जिल्ह्यात शेवगाव तालुक्यात एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. उर्वरित शहर व जिल्ह्याच्या अन्य तालुक्यामध्ये एकाही पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झालेली नाही.
उपचारासाठी दाखल होणारे रुग्ण शून्यावर
कोरोना लसीकरण मोठ्या प्रमाणात झाल्याने सहाजिकच दैनंदिन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांत घट झाली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणारे रुग्णही शून्यावर आले आहेत. त्यामुळे अन्य बाह्यरुग्ण कक्ष आम्ही पाच महिन्यापूर्वीच सुरू केला आहे. शिवाय ऑक्सिजन व औषधांचा साठाही मुबलक प्रमाणात आहे.''
डॉ. मनोज घुगे,वैद्यकीय अधिकारी जिल्हा रुग्णालय.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.