आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वनवास संपेना:नगर-मनमाड रस्त्याचे काम अर्धवट; उत्तर-दक्षिण भारतातून शिर्डीकडे जाणाऱ्या भाविकांना मनस्ताप

नगर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नगर-मनमाड रस्त्याच्या कंत्राटदाराने कंत्राट रद्द करण्यासाठी दिले राष्ट्रीय महामार्ग पत्र

तीन वर्षापासून रखडत असलेल्या नगर-मनमाड रस्त्याच्या कामाला गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मुहूर्त लागला होता. मात्र कंत्राटदाराने हा रस्ता पुन्हा अर्धवट सोडला आहे. त्यामुळे उत्तर - दक्षिण भारतातून शिर्डीत येणाऱ्या भाविकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

विळद घाट ते सावळीविहीर दरम्यान होणाऱ्या या रस्त्याचे पुढच्या अनेक वर्षांचा विचार करून काम करण्यात येणार होते. मात्र हे काम थांबल्याने ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. मनमाड रस्त्यावर सुरू असलेले काम अर्धवट आहे. तर काही ठिकाणी रस्ता खोदून ठेवला आहे. त्यामुळे वाहतूकही एकेरी आहे. रस्त्याच्या बाजूला बांधकाम साहित्य असल्याने वाहनचालकांना त्याचाही त्रास सहन करावा लागत आहे.

मंत्री नितीन गडकरी घेणार आज आढावा
केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी शुक्रवारी शिर्डी येथे शिर्डी, नगर जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पांचा आढावा घेणार आहेत. यात नगर- मनमाड रस्ता व अहमदनगर शहरातील उड्डाणपुलाचा ते आढावा घेणार आहेत. नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेल्या अन्य प्रकल्पांचाही मंत्री गडकरी या दौऱ्यात आढावा घेणार आहेत.

रस्त्याच्या दुरवस्थेमुळे उत्तर दक्षिण भारतातील भाविकांची शिर्डीला हवाईमार्गे जाण्यास पसंती
उत्तर व दक्षिण भारतातून रस्ता मार्गे भाविक आल्यास त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे आलेले भाविक दुसऱ्यांना या रस्त्याबाबतची माहिती देतात. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे उत्तर दक्षिण भारतातून येणारे भाविक हवाई मार्गाने किंवा रेल्वेमार्गाने शिर्डीला येणे पसंत करतात.

नगर-मनमाड रस्त्याबाबत दिल्लीत निर्णय
नगर -मनमाड रस्त्याचे काम चार आठवड्यापासून थांबलेले आहे. हे काम रद्द करण्यासाठी संबंधित कंत्राटदाराने राष्ट्रीय महामार्ग विभागाला पत्र दिलेले आहे.यावर अद्याप निर्णय झालेला नाही. दिल्लीत या विषयावर चर्चा होणार आहे. येत्या दहा ते पंधरा दिवसात यावर निर्णय होऊन पुढच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. खाणी बाबतचा कंत्राटदाराचा विषय होता तसेच अन्य कारणांमुळे हे काम रद्द करण्याचे पत्र दिले होते. असे राष्ट्रीय महामार्ग विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांने गुरुवारी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

नगर-मनमाड रस्त्याचे अवघे ७.५०टक्के काम
नोव्हेंबर महिन्यापासून विळद घाट ते सावळीविहीर या ७५ किलोमीटर रस्त्याचे काम कंत्राटदाराने सुरू केले होते. राहुरी ते बाबळेश्वर दरम्यानच्या रस्त्याचे व नगरकडे येणाऱ्या काही रस्त्याचे काम सुरू होते. गेल्या सहा महिन्यात केवळ ७.५० टक्केच काम या रस्त्याचे झाले आहे. उर्वरित रस्ता मात्र अर्धवट खोदून ठेवला आहे. त्यामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...