आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासाईबाबा संस्थानच्या सीईओ भाग्यश्री बानायत यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात साईबाबा विशिष्ट धर्माचे असल्याचा उल्लेख केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून देश- विदेशातील कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेला ठेच पोहोचवणारे हे वक्तव्य असल्याची भावना व्यक्त होत आहे. साईबाबांच्या धर्मनिरपेक्षतेलाच नख लावण्याचा हा प्रयत्न असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. विश्वस्त मंडळाच्या बैठकीत सर्वपक्षीय ग्रामस्थांनी बानायत यांचा निषेध करत झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागावी, अन्यथा उद्या शिर्डी बंद ठेवून निषेध नोंदवला जाईल, असा इशारा दिला. त्यानंतर बानायत यांनी दिलगिरी व्यक्त करत ज्यांनी माहिती दिली त्यांच्यावर कारवाईचे आश्वासन दिल्याने या वादग्रस्त विधानावरून संतप्त ग्रामस्थ व साईभक्तांमधील नाराजीवर पडदा पडला. राज्यातील एका खासगी समूहाने व्हिजन कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन केले होते. या कार्यक्रमाला बानायत यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. त्यात बानायत यांनी साईबाबा विशिष्ट धर्माचे असल्याबाबत उल्लेख केला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर साईभक्तांमध्ये खळबळ उडाली. संस्थान विश्वस्त मंडळ बैठकीत सर्वपक्षीय ग्रामस्थ पोहाेचल्यानंतर माजी नगराध्यक्ष कैलास कोते, शिवसेनेचे कमलाकर कोते, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, सचिन तांबे यांनी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांना धारेवर धरत बानायत यांनी माफी मागावी. अन्यथा, शिर्डीकर गाव बंद आंदोलन करतील असा इशारा दिला होतो.
सीईओ यांच्याकडून दिलगिरी
साईबाबांच्या संदर्भात माझ्याकडून जे वक्तव्य केले गेले, त्यामुळे ग्रामस्थ आणि भाविकांच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करते. मला ज्यांनी याबाबत माहिती दिली त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे साईबाबा संस्थानच्या सीईओ भाग्यश्री बानायत यांनी सांगितले.
शिर्डी गॅझेटियरमधील संदर्भ
हिंदू साईबाबांना संत म्हणत तर मुस्लिम पीर समजत. साईबाबांची एका फाैजदारी खटल्यात कमिशनसमोर साक्ष झाली होती. तेव्हा त्यांनी आपला पंथ किंवा धर्म कबीर (हिंदू -मुस्लिम ऐक्याचे प्रतीक) आणि जात परवरदिगार (अल्ला-ईश्वर) असल्याचे सांगितले होते. साईबाबांची जात धर्म माहीत नसल्याने ते सर्वधर्मसमभावाचे प्रतीक आहेत.
आता हा विषय संपला
बानायत यांनी आपल्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादावर दिलगिरी व्यक्त केल्याने आता हा विषय संपला आहे. ज्यांनी याबाबत बानायत यांना माहिती दिली असेल त्यांच्यावरही कारवाई होईल. -आशुतोष काळे, अध्यक्ष, साई संस्थान विश्वस्त मंडळ
सीईओंनी संवाद ठेवला पाहिजे
साईबाबांच्या श्रद्धेला हात घालणाऱ्या प्रवृत्तींविरोधात शिर्डीतील सर्वपक्षीय ग्रामस्थ एकत्र येतात. नगरपंचायत, ग्रामस्थ आणि संस्थानामधील सुसंवादामुळे भाविकांसाठी शिर्डीत कामे झाली. मात्र, अलीकडच्या काळात आपण पदसिद्ध विश्वस्त व नगराध्यक्ष असतानाही संस्थान सीईओ फोन घेत नाहीत. पूर्वीसारखा संवाद सीईओंनी ठेवला पाहिजे. -शिवाजी गोंदकर, नगराध्यक्ष, शिर्डी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.