आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअहमदनगर शहरातील बोल्हेगाव- नागापूरचा पाणी पुरवठा गेल्या दहा महिन्यांपासून विस्कळीत झाला आहे. महापालिका प्रशासनाकडे वारंवार पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी निवेदने, बैठका घेतल्या. तसेच पाण्याच्या टाकीवरती जाऊन सूचनाही केल्या. मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अद्याप पर्यंत पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही. त्यामुळे मनपा प्रशासनाच्या निषेधार्थ शुक्रवारी ( 3 मार्च) ला प्रभागातील नागरिकांनी नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर मोर्चा काढला. यावेळी संतप्त झालेल्या महिलांनी महापालिकेच्या दारात माठ फोडून प्रशासनाचा निषेध केला.
नगरसेवक कुमारसिंह वाकळे म्हणाले की, नागापूर बोल्हेगावचा पाणी प्रश्न प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे तीव्र स्वरूपाचा बनला आहे. आठ ते दहा दिवसापर्यंत पाणी येत नाही. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. नगरसेवकांनाही नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. प्रभागातील नागरिकांनी फेज टू पाणी योजनेचे कनेक्शन घेण्यासाठी पैसे भरले. मात्र त्यांना त्याद्वारे पाणी दिले जात नाही. फेज टू योजनेचे काम सुरू असताना अनेक ठिकाणी पाईपलाईन नादुरुस्त आहे.
बोल्हेगाव-नागापूर भागाचा पाणीपुरवठा सुरू असताना केडगाव व शहर भागाचे पंपिंग सुरू केल्या जातात पंपिंग स्टेशनवरील कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत असतात ते केव्हाही कुठल्याही भागाचा पाणीपुरवठा सुरू करतात. आमच्या हक्काचे पाणी आम्हाला दिले जात नाही. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. पाणी प्रश्न हा नागरिकांचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. नियोजनाच्या अभावामुळे हा प्रश्न सुटला जात नाही.
इंजिनीयर मनमानी पद्धतीने काम करतात. फेज टू पाणी योजनेच्या टाकीत पाणी चढत नाही. पूर्वी ही टाकी दररोज भरली जात होती. आता उन्हाळ्याचे दिवस जवळ आले आहे तरी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. नागापूर बोल्हेगाव परिसरातील पाईपलाईन दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्यावे नवीन पाईपलाईन टाकून मिळावी व विस्कळीत झालेला पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करावा अशी मागणी यावेळी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
यावेळी मनपा विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, नगरसेवक डॉ.सागर बोरुडे, माजी नगरसेवक निखिल वारे आदीसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे उपायुक्त यांचे आश्वासन
महापालिकेचे उपायुक्त यशवंत डांगे यांनी नव्याने विकसित झालेल्या भागाला नवीन पाईपलाईन टाकून दिल्या जातील. फेज टू पाणी योजना सुरळीत करण्यासाठी उपाय योजना केल्या जातील. असे आश्वासन दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.