आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:नगर-पुणे महामार्गावर ट्रकचे टायर फुटले, दोन ट्रकमध्ये दुचाकी चिरडली; चाैघे ठार, मृतांत बीड जिल्ह्यातील पिता-पुत्र

पारनेर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर-पुणे महामार्गावर दोन मालवाहू ट्रक व दुचाकीच्या भीषण अपघातात वडील व मुलासह चार जण जागीच ठार झाले. सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास हा अपघात झाला. मृतांमध्ये दोन दुचाकीस्वार, मालमोटारचालक व त्याच्या क्लीनरचा समावेश आहे. अपघात एवढा भीषण होता की, अपघातग्रस्त मालट्रकचा चालक आणि सहायक वाहनाच्या समोरच्या बाजूला लटकत होते, तर दुचाकीसह दोन्ही दुचाकीस्वार चिरडले गेले.

मालट्रकचालक शुभम राजू देशभ्रतार (२४, रा. दुधाडा, ता. काटोल, नागपूर), सहायक राहुल मधुकर डोंगरे (३१, रा. सावली, ता. कारंजा, जि. वर्धा) या दोघांसह दुचाकीवरील राजाभाऊ विष्णू चव्हाण (५०, रा. जातेगाव, ता. गेवराई, बीड) व त्यांचा मुलगा पुरुषोत्तम (१८) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. सुपे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन गोकावे पथकासह घटनास्थळी पोहोचले. क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त मालट्रक रस्त्याच्या बाजूला काढण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पारनेरच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.

लोखंडी पाइप चालकाच्या केबिनमध्ये घुसला
जे. के. ट्रान्सपोर्ट व के. टी. ट्रान्सपोर्ट कंपनीचे मालट्रक पुण्याहून नगरच्या दिशेने निघाले होते. के. टी. कंपनीच्या मालट्रकचे (एमएच ४० एके २५६३) मागचे टायर फुटल्याने या ट्रकच्या चालकाने अचानक गाडी थांबवली. या ट्रकच्या पाठीमागे दुचाकी चालली होती. दुचाकीच्या मागे लोखंडी पाइप भरलेला ट्रक येत होता. पुढचा ट्रक थांबल्याने मागील ट्रकच्या चालकाने जोरात ब्रेक दाबला. त्या धक्क्याने ट्रकमधील लोखंडी पाइप मागील ट्रकचालकाच्या केबिनमध्ये घुसले. हा ट्रक तशाच अवस्थेत दुचाकी व दुचाकीवरील दोघांना चिरडत समोरच्या ट्रकला मागून धडकला.

बातम्या आणखी आहेत...