आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंकजा मुंडे यांच्याशी माझे वैर नाही, मात्र तिच्या जवळचे लोक चुकीचे आहेत, पंकजाने आपला अहंकार कमी करावा, असा सल्ला भगवानगडाचे महंत डॉ. नामदेवशास्त्री यांनी दिला. तर, कीर्तनाच्या मंचावर संतांनी राजकारण करू नये, असे प्रत्युत्तर पंकजा मुंडे यांनी दिले.
पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी येथील नारळी सप्ताहानिमित्त भगवानगडाचे महंत डॉ. नामदेवशास्त्री व पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर आले होते. भगवान गडावर मेळावा घेण्यावरुन पंकजा मुंडे व महंत नामदेवशास्त्री यांच्यामध्ये अनेकदा खटके उडाले आहेत. गडावर राजकीय कार्यक्रम घेता येणार नाही, अशी भूमिका महंत नामदेवशास्त्रींनी घेतल्यामुळे दोघांमध्येही तणावर निर्माण झाला होता. अशात पाथर्डीत प्रथमच पंकजा मुंडे व महंत नामदेवशास्त्री एकाच व्यासपीठावर आले व यावेळी त्यांनी एकमेकांविषयी चांगलीच टिकाटिप्पणी केली.
पंकजांच्या आजुबाजूचे लोक चुकीचे
महंत नामदेवशास्त्री म्हणाले, खूप दिवसानंतर पंकजा समोर बोलायची संधी मिळाली आहे. तिला मी मुलगी मानत असल्याने तिचा दुस्वास करू शकत नाही. मात्र, पंकजा यांच्या आजुबाजूचे लोक चुकीचे आहेत. त्यामुळे मी सांगतो एक आणि पंकजांपर्यंत पोहोचते एक. पण, पंकजांनी अहंकार कमी करायला हवा. तिने स्वाभिमान बाळगायला माझी हरकत नाही. जनता ही कधी कोणासोबत नसते. जे काल धनंजय मुडेंना शिव्या देत होते, ते आज धनंजय मुंडेंच्या मागे-मागे फिरत आहेत.
धनंजय मुंडेंचे केले कौतुक
पुढे नामदेवशास्त्री म्हणाले, भगवानबाबांच्या स्वप्नपूर्तीसाठी मी प्रयत्न करत आहे. पंकजा व धनंजय या दोन्ही भावंडांनी मोठी भरारी घ्यावी, अशी आपली इच्छा आहे. धनंजय मुंडेंची आई ही गडाची भक्त होती. या गडावर धनंजय मुंडे यांच्या गाडीवर दगडफेक झाली होती. मात्र आज याच गडावर चालू असलेल्या मंदिराच्या बांधकामाचे दगड देण्याचे भाग्य धनंजय मुंडे यांच्या नशिबी आले आहे. दहा एकर जमीन गडाला मिळावी म्हणून मी खूप प्रयत्न केले मात्र उपयोग झाला नाही. मात्र हे काम धनंजय मुंडे यांनी केले.
मी अहंकारी नाही- पंकजा मुंडे
नामदेवशास्त्रींना प्रत्युत्तर देताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी मोठ्याने बोलले तर तो अहंकार आहे असे समजू नका. मी स्त्रीच्या शरीरात जन्माला आले आहे. आपल्या समाजात स्त्री मोठ्याने बोलली की तो अहंकार समजला जातो. पुरुषाने शिवीगाळ केली तर त्याला सुधारण्याची संधी दिली जाते. मात्र, स्त्रीला ही संधी दिली जात नाही.
शिव्या दिल्या तरी फुलासारख्या मानेल
पंकजा मुंडे म्हणाल्या, मी आजही स्वतःला गडाची पायरी आहे, असे मानते. भगवानगड माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. महंतांच्या केसाला धक्का लागू नये ही माझी भावना आहे. येथून पुढे राजकारण याच गडाखालून कर, असा सल्ला त्यांनी दिल्यानंतर मी हिरकणीसारखे भगवानगडावरून खाली आले. तुम्ही शिव्या जरी दिल्या तरी मी त्या फुलासारख्या मानेल.
संबंधित वृत्त
कटुता संपली?:माझा भाऊ मोठा झाल्याचा मला आनंदच-पंकजा मुंडे; आमच्यात सुईच्या टोकाएवढेही वैर नाही- धनंजय मुंडे
एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांच्यातील बहिण-भावाचे प्रेमाचे नाते पुन्हा एकदा पाहायला मिळाले. मंगळवारी पाथर्डी येथे नारळी सप्ताहाच्या कार्यक्रमात धनंजय मुंडे व पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर आले. यावेळी माझा भाऊ मोठा झाल्याचा मला आनंदच आहे, असे कौतुकाचे उद्गार पंकजा मुंडेंनी काढले. तर, पंकजा आणि माझ्यात सुईच्या टोकाऐवढेही वैर नाही, असे धनंजय मुंडे म्हणाले. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.