आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळासाहेब थोरात राजकीय संन्यासाच्या वाटेवर?:नाशिक पदवीधरचे सत्यजित तांबे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काँग्रेसने एबी फॉर्म दिलेला असतानाही पक्षाला टाळून अपक्ष अर्ज भरणे ही सत्यजित तांबे आणि सुधीर तांबे यांची कृती राज्यात काँग्रेसचा धाक जवळजवळ संपुष्टात आल्याचे लक्षण असून यासंदर्भात त्यांचे मामा ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी बाळगलेले कडकडीत मौन म्हणजे तांबे पिता-पुत्रांच्या भूमिकेला अप्रत्यक्षरीत्या दिलेले समर्थनच मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर विजयाची घोषणा झाल्यानंतर लगेचच नवनिर्वाचित विधान परिषद आमदार सत्यजित तांबे भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवलेले स्व. राजीव राजळे हेदेखील बाळासाहेब थोरात यांचे भाचे होते. काँग्रेस सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा त्यांचा निर्णयदेखील सत्यजित तांबे यांच्यासारखाच धाडसी मानला गेला होता. परंतु तेव्हाही “मामा' या नात्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी मौनच बाळगले होते. “प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे' एवढेच उत्तर त्यांनी त्या वेळीही दिले होते. आता तर त्यांची नेमकी भूमिका काय आहे याचे गौडबंगाल अद्यापही कोणालाच उलगडलेले नाही. नाशिक पदवीधर विधानसभा विधान परिषद मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करताना बाळासाहेब थोरात यांच्या ज्येष्ठ कन्या डॉ. जयश्री थोरात या आवर्जून सत्यजित तांबे यांना भेटून गेल्या होत्या. त्यामुळे तांबे - थोरात कुटुंबीयांना सत्यजित यांच्या बंडाविषयी निश्चितच पूर्वकल्पना होती किंबहुना या बंडाला त्यांचे समर्थनही होते, अशीच चर्चा नगर जिल्ह्यामध्ये सुरू होती.

थोरात कधी बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष
डॉ. जयश्री थोरात यांचे बंधुप्रेम आणि बाळासाहेब थोरात यांचे मौन या दोन्हीही घटनांचा राजकीय अर्थाने आपापसात संबंध लावायचा म्हटला तर बाळासाहेब थोरात लवकरच पक्षीय राजकारणातून निवृत्ती स्वीकारणार असून आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संगमनेर मतदारसंघातून डॉ. जयश्री बाळासाहेब थोरात भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवतील, अशी जोरदार चर्चा राज्यात सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर सत्यजित तांबे यांच्या भाजप प्रवेशाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे आता बाळासाहेब थोरात याबाबत काय बोलणार याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...