आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनंजय मुंडेंचा फडणवीसांना टोला:दुसऱ्याची जिरवण्यासाठी स्वतःची जिरवून घेणे म्हणजे आताचे राज्य सरकार

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाविकास आघाडी सरकार तुम्ही पाडले, पण पाडूनही तुम्हाला मुख्यमंत्री होता येत नाही. किती वाईट परिस्थिती आहे. दुसऱ्याची जिरवण्यासाठी स्वतःची जिरली, तरी चालेल असा प्रकार म्हणजे आत्ताचे सरकार, असा टोला माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांसह भाजपला लगावला.

राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे जल जीवन मिशनच्या ४० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन काही दिवसांपूर्वी भाजपने केले होते. याच योजनेचे दुसरे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने माजी मंत्री मुंडे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मुंडे बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी माजी मंत्री आमदार प्राजक तनपुरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भिटे, सुरेश बाफना आदी उपस्थित होते.

तरी मुख्यमंत्री पद नाही

मुंडे म्हणाले, महाविकास आघाडी सरकार पडले पण, पाडूनही त्यांना मुख्यमंत्री होता येत नाही किती वाईट परिस्थिती आहे. ज्यांनी माणसं फोडले सुरत होऊन गुवाहाटी, गुवाहाटीहून गोवा आणि पुन्हा मुंबईत त्यांना आणले. तरी, भाजपला मुख्यमंत्री पदावर बसता आले नाही, अशी खील्ली मुंडे यांनी उडवली. दुसऱ्याची जिरवण्यासाठी स्वतःची जिरली तरी चालेल, तो प्रकार म्हणजे आत्ताचे सरकार आहे, असेही मुंडे म्हणाले.

खासदार विखेंना टोला

मुंडे म्हणाले, खासदारांची ऐपत मोठी आहे, आता महसूल मंत्री पद मिळाले. हे पद चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांना मिळाले नाही. एवढे जर तुमचे संबंध आहेत तर या चाळीस कोटींच्या पाणी योजनेचे श्रेय घेऊ नका. हजार ते दोन हजार कोटींचा प्रकल्प आणून मग श्रेय घ्या, असा सल्ला धनंजय मुंडे यांनी खासदार सुजय विखे यांना दिला.

नीट कसं करायचं ते पाहू

यापूर्वी वांबोरीत जे चालायचे ते आता चालणार नाही. आता ऐकायला कटू वाटत असले तरी ते ऐकावं लागेल. ज्यांना सहन होत नसेल तर त्यांना कस नीट करायचं ते आम्हाला माहित आहे, असा टोला आमदार प्राजक्त तनपुरे यांनी स्थानिक विरोधकांचे नाव न घेता लगावला.

त्यांनी मुलाला हे धंदे शिकवले का?

वडीलांना त्यांची मुलं धंदा करायला सांगत नाहीत. पण वडील मुलाला धंदा शिकवतात. मग यांनी त्यांच्या मुलांना गावातील जमिनी विकायच्या? डेअरीच्या जमिनी विकायच्या? डेअरीच्या जमिनी विकून लोकांना फसवायचे हे धंदे शिकवले का? असा सवाल माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भिटे यांनी विरोधकांना केला. पतसंस्थेत ठेवलेल्या ठेवी देखील यांनी परत न केल्याने अनेकांचे विवाह थांबले, अशीही टीका त्यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...