आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाकित:राष्ट्रवादीच्या शिर्डी अधिवेशनानंतर राज्यातील शिंदे सरकार कोसळणार

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शुक्रवार व शनिवारी (४ ते ५ नोव्हेंबर) शिर्डी येथे राज्यव्यापी मंथन व वेध भविष्याचा हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यापार्श्वभूमीवर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नगर येथे पत्रकारांशी बोलताना मध्यवधी निवडणुका केव्हाही लागू शकतात, त्यासाठी आमची तयारी आहे. आम्ही शिर्डीत जाऊन स्नेही खासदार सुजय विखे यांना सांगणार आहोत की, एक अधिवेशन झाले होते, तेव्हा सरकार पडले होते. आता आमचे शिर्डीतील अधिवेशन झाल्यानंतर हे सरकार पडेल, असा दावा केला. या शिबिरासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत. शिबिरात विविध क्षेत्रातील विचारवंत, देशातील सामाजिक, राजकीय स्थितीबाबत मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी राज्यभरातील पक्षाचे आजी माजी आमदार, जिल्हाध्यक्ष आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, शिंदे गटाचे कोणी आमच्या संपर्कात नाही, पण त्यांच्या भावना त्यांनी आमच्याकडे पोहोचवल्या आहेत. मंत्रिमंडळ विस्तार झाला की ते दाखवून देतील. त्यांच्या गटातील नऊ ते दहा लोक विस्तारापर्यंत थांबतील, पण एवढा संयम त्यांनी बाळगला याचे कौतूक आहे. मध्यावधी निवडणुका लागतील असे वाटते, त्यासाठी आम्ही तयार आहोत. भाजपने टोळीबरोबर आघाडी केली. ही आघाडी फक्त एका गटासोबत आहे, पक्षाबरोबर नाही. त्यांचा उपयोग संपला की भाजप त्यांना नारळ देईल, त्यानंतर निवडणुका होण्याची शक्यता आहे. खासदार सुजय विखे यांनी काँग्रेसचे अधिवेशन झाले त्यावेळी सरकार पडले होते, आता राष्ट्रवादीचे अधिवेशन झाल्यानंतर त्यांचा पक्ष फुटेल, अशी टीका केल्याबाबत पत्रकारांनी विचारले असता, पाटील म्हणाले, विखे यांनीच तिथला पायगुण सांगितला याचे कौतुक वाटते. पण आम्ही शिर्डीला येऊन सांगणार आहोत. एका अधिवेशनानंतर यापूर्वी सरकार पडले होते. आता आमच्या अधवेशनानंतरही सरकार पडणारच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस भक्कम पक्ष असून फुटण्याचा प्रश्नच नाही. यावेळी आमदार संग्राम जगताप, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके उपस्थित होते.

विधानसभा अध्यक्ष आज शिर्डीत महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. गुरुवारी रात्री शिर्डी येथे त्यांचे आगमन झाले. शुक्रवारी (४ नोव्हेंबर) श्री साईबाबा संस्थान येथे काकड आरतीस उपस्थित राहणार आहेत. त्‍यानंतर दुपारी २ वाजेपर्यंत ते शिर्डी येथेच थांबणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे दोन दिवसीय शिबीर आजपासून शिर्डीत होत आहे. याच दरम्यान विधानसभा अध्यक्षही शिर्डीत असल्याने त्यांचा दौरा चर्चेत आला आहे.

पवार आणखी २ दिवस रुग्णालयात मुंबई| राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना उपचारांसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले आहे. त्यांना पूर्वनियोजनानुसार गुरुवारी रुग्णालयातून सुटी देण्यात येणार होती. परंतु, आणखी एक-दोन दिवस त्यांना रुग्णालयात राहावे लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे शिर्डीत शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनाला ते उपस्थित राहू शकणार नाहीत, असे समजते.

बातम्या आणखी आहेत...