आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धरणे:जवळे बाभळेश्वर 11 गाव योजनेस विरोध नाही, पण नवीन उद्भव शोधा; सीताराम गायकर यांची मागणी

अकोले18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपळगावखांड लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसह ग्रामस्थांचे दोन महिन्यापासून न्याय हक्कांबाबत आंदोलन सुरू आहे. त्यावरच इथल्या कुटुंबातील सर्वांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. त्यात नव्याने पिण्याच्या पाण्याचे आरक्षण दिल्यास इथले सर्व शेतकरी उद्ध्वस्त होतील. जवळे बाभळेश्वर ११ गाव सामुदायिक योजनेंतर्गत पिण्यास पाणी देण्यास येथील शेतकऱ्यांचा अजिबात विरोध नाही. पण पिंपळगावखांड प्रकल्पाऐवजी नवीन उद्भव शोधूनच नळयोजना मार्ग लावण्याची आमची मागणी आहे. यात योजनेच्या खर्चातही कपात होईल. योजनेचा उद्भव पिंपळगावखांड प्रकल्पाखाली तांगडी, कोठे वा मुळा खोऱ्यात शक्य होईल तिथे शोध घेण्यासाठी सर्व सहकार्य करण्यास आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह आपण सर्वजण प्रयत्नशील आहोत. यासाठी सर्वांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन अगस्तीचे उपाध्यक्ष सीताराम पाटील गायकर यांनी केले.

पिंपळगावखांड प्रकल्पातून संगमनेर पठारावरील सामुदायिक योजनेच्या पाण्यासाठी पिंपळगावखांड जलाशयातून पाणी उपसा न करता नवीन उद्भव शोधावा, या मागणीसाठी रविवारी (१२ जून) सकाळी ९ ते सायंकाळपर्यंत पिंपळगावखांड प्रकल्पावर शेतकऱ्यांनी धरणे सत्याग्रह केला. यावेळी सीताराम गायकर बोलत होते. यावेळी मीनानाथ पांडे, भाऊसाहेब रक्टे आदींसह अनेकांची भाषणे झाली. धरणे आंदोलनात अगस्तीचे उपाध्यक्ष सीताराम गायकर यांच्या नेतृत्वाखाली मुळा खोऱ्यातील धामणगावपाट, पांगरी, मोग्रस, कोतूळ, भोळेवाडी, पिंपळगावखांड, बोरी, वाघापूर, लहीत खुर्द, लहीत बुद्रूक, लिंगदेव, चास, पिंपळदरी आदींसह २१ गावांतील शेतकरी सहभागी होते. याप्रसंगी अगस्तीचे संचालक अशोक देशमुख, मच्छिंद्र धुमाळ, शरद चौधरी, प्रमोद मंडलिक, विकास शेटे, पाणी बचाव कृती समितीचे भाऊसाहेब बराते, शिवाजी वाल्हेकर, प्रभाकर फापाळे, सोपान शेळके, भानुदास डोंगरे, भाऊसाहेब लांडे, भाऊसाहेब हाडवळे, संजय साबळे, सदाशिव कानवडे, भाऊपाटील कानवडे, माधव कोरडे, अतूल चौधरी, विठ्ठल साबळे, दत्ताराम साबळे, सुरेश देशमुख, रोहिदास भोर, ज्ञानेश्वर भोर, नारायण थटार, दगडू डोंगरे, लहानू चौधरी आदी उपस्थित होते.

पिंपळगावखांड प्रकल्प उद्भव धरून संगमनेर तालुक्यातील पठारावरील ११ गाव सामुदायिक नळपाणी योजनेचे बुधवारी टेंडर प्रसिद्ध झाले. या योजनेतील गावे अकोले विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असल्याने आमदार डॉ. लहामटे यांनी योजनेस ना हरकत प्रमाणपत्र दिले. मात्र, योजना कार्यान्वित झाल्यास पिंपळगावखांड प्रकल्पातून शेतपिकांना यापुढे पुरेसे पाणी उपलब्ध होणार नाही. हे भीतीचे सावट लाभक्षेत्रात शेतकऱ्यांसमोर उभे आहे. आमदार डॉ. लहामटे व गायकर यांना कारखाना निवडणुकीच्या तोंडावर खिंडीत पकडण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा आरोप विरोधकांवर होत आहेत.

जीवन प्राधिकरणला देण्यात आले होते मागणीचे निवेदन
रविवारी धरणे आंदोलनास बसलेल्या शेतकऱ्यांनी गुरुवारी ७ जूनला सीताराम गायकर व मीनानाथ पांडे यांच्यासह मुळा खोऱ्यातील शिष्टमंडळाने नाशिक येथे जाऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता एस. पी. भुजबळ यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले होते. त्यानुसार रविवारी धरणे आंदोलन करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...