आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराजकीय हेतूने सुरू असलेल्या सलग कारवायांमुळे नेवासे तालुका दूध संघाला टाळे ठोकण्याचा निर्णय दूध संघ व्यवस्थापनाने घेतला आहे. माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या ताब्यातील नेवासे तालुका दूध संघ अखेर बंद करण्यात आल्याने हजारो दूधउत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. संघाची वीज तोडू नये, असा न्यायालयाचा आदेश असतानाही वीजजोड तोडल्याने गडाख यांना राजकीय शॉक दिल्याचे बोलले जाते.
नेवासे तालुक्यात दूधउत्पादकांना कुठे दूध घालायचे, असा प्रश्न निर्माण झाला, त्यावेळी आमदार गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली या दूध संघाची निर्मिती झाली होती. मोठे राजकीय वजन वापरून, सतत पाठपुरावा करुन गडाख यांनी त्यास परवानगी मिळवली. संघामार्फत तालुक्यातील ७२ गावांत दूध थंड करण्यासाठी चिलिंग मशीनसाठी अनुदान देण्यात आले. त्यातून शेतकऱ्यांना हक्काचे पैसे मिळू लागले व अर्थकारणाला गती आली. घोडेगाव येथे जनावरांच्या बाजारात येणाऱ्या शेतकऱ्यांना पशुपालनास प्रोत्साहन देणारे व मार्गदर्शन करणारे विविध शिबिरे राबवून संघामार्फत मदत करण्यात आली. महानंद, आरे, तसेच गुजरातमधील ‘अमूल’ दूध संघांशी करार केल्याने दूधउत्पादकांना वाढीव पैसे मिळू लागले.
तिरमली, डवरी गोसावी, वाघवाले अशा हातावर पोट असलेल्या व अल्पभूधारक शेतकऱ्यांना जनावरे खरेदी करण्यासाठी दूध संघामार्फत बिगरव्याजी ४ ते ५ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आळे. त्यामुळे सर्वसामान्यांना दूध संघाचे पाठबळ मिळून आर्थिक पत निर्माण झाली. आता हक्काचा दूध संघ बंद झाल्याने दूध उत्पादक व कामगारांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. नेवासे तालुका दूध संघातील ५० कर्मचारी बेरोजगार झाले असून, त्यांच्या कुटुंबांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुळा शिक्षण संस्थेचीही तक्रार
आमदार गडाख हे राजकीय चक्रव्यूहात अडकत चालल्याचे दिसते. दूध संघ बंद झाला असून, आता मुळा शिक्षण संस्थाही अडचणीत सापडली आहे. या संस्थेची तक्रार शासनाकडे करण्यात आली असून, लवकरच त्याचा निर्णय होणार असल्याचे बोलले जाते. विरोधकांचा चक्रव्यूह भेदता न आल्याने गडाख मोठ्या संकटात सापडले आहेत.
कर्मचाऱ्यांना इतरत्र सेवेत घेऊ
आमदार गडाख यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेला संघ बंद करताना मनाला मोठ्या वेदना होत आहेत. गावागावात दूध संकलन केंद्रांमार्फत दूध संकलित होते. या दूधउत्पादकांची अडचण झाली आहे. संघाच्या कर्मचाऱ्यांना इतरत्र सेवेत घेऊन त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवण्यासाठी गडाख प्रयत्नशील आहेत. गणपत चव्हाण, अध्यक्ष, दूध संघ.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.