आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई, पुणे, नागपूरनंतर राज्यातील सर्वात व्यग्र एअरपोर्ट म्हणून अधोरेखित झालेल्या शिर्डी येथील साईबाबा अांतरराष्ट्रीय विमानतळावरून अखेर शनिवारी रात्री विमानांच्या नाइट लँडिंग व टेकअॉफचा प्रारंभ झाला. दिल्लीहून टेकऑफ घेतलेल्या इंडिगो एअरलाइन्स विमानाचे रात्री ८.१५ वाजता शिर्डीत यशस्वी लँडिंग होताच विमानातील प्रवाशांनी साईनामाचा जयघोष करत जल्लोष केला. तर, रात्री ९ वाजता याच विमानाने दिल्लीला जाण्यासाठी शिर्डीतून टेकअॉफ केले. नाइट लँडिंग- टेकअॉफमुळे शिर्डीसाठी दिवसाप्रमाणे देशांतर्गत रात्रीच्याही विमानांची उड्डाणे वाढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.यामुळे शिर्डीसह उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील पर्यटन, कृषी आणि औद्योगिकीकरणाला गती मिळणार आहे.नियोजित वेळेच्या १५ मिनिटे अगोदर विमानाचे यशस्वी नाइट लँडिंग झाले.
ऑक्टोबर २०१७ मध्ये साईबाबा समाधी शताब्दीच्या प्रारंभाला तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शिर्डी विमानसेवेचे लोकार्पण झाल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच विमानसेवेला प्रवाशांनी पसंती दर्शवली. दिल्ली, हैदराबाद, चेन्नई, बंगळुरू, तिरुपती, इंदूर, विजयवाडा, विशाखापट्टणम आदी भागातून शिर्डीत येणाऱ्या भाविकांनी विमानसेवेला मोठा प्रतिसाद दिला. शिर्डीत नाइट लँडिंग सुरू करण्याबाबत २०१८ मध्ये घोषणा करण्यात आली होती.
चार वर्षांनी हे लँडिंग सुरू झाले. नाइट लँडिंगनंतर शिर्डीतील देशांतर्गत आणि अांतरराष्ट्रीय दर्जाच्या टर्मिनलसाठी राज्य सरकारने नुकतीच ५२७ कोटी रुपयांची तरतुद केली आहे. प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा या नवीन टर्मिनल बिल्डिंगमध्ये मिळतील. शिर्डीत कार्गो सेवा सुरू झाल्यास उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील कृषी तसेच औद्योगीकरणास चालना मिळू शकेल.
शिर्डीत पहिले नाईट लँडिंग झाल्यानंतर प्रवाशांच्या हस्ते केक कापून आनंद साजरा करण्यात आला. विमानतळ संचालक सुशिलकुमार श्रीवास्तव व मुरली कृष्णा यांच्या हस्ते सर्व विमान प्रवाशांचे गुलाबपुष्प आणि नाष्टा पाकिट देऊन स्वागत करण्यात आले.
सिंगापूर, दुबईहून काही कंपन्या सेवा सुरू करण्यास उत्सुक प्रारंभापासूनच विमानसेवेला प्रचंड प्रतिसादामुळे हज यात्रेकरूंसाठी शिर्डीतून अांतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. सिंगापूर, दुबई येथूनही काही विमान कंपन्या शिर्डीसाठी सेवा सुरू करण्यास उत्सुक असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
प्रवाशांनी मानले सरकारचे आभार पहिल्या नाइट लँडिंग झालेल्या इंडिगो एअरवेज बोइंग विमानात दिल्लीहून २३२ तर शिर्डीतून दिल्लीकडे जाणाऱ्या पहिल्या नाइट टेकऑफमध्येही २३२ प्रवासी होते. या प्रवाशांनी केंद्र-राज्य सरकारचे आभार मानले.
चेन्नई, दिल्लीसाठी अतिरिक्त; इंदूर, विशाखापट्टणमसाठीही सेवा सुरू शिर्डीतून विमानांची नाइट लँडिंग व टेकऑफला डीजीसीएने १६ फेब्रुवारी २०२३ ला परवानगी देताच चेन्नई ते शिर्डीसाठी दिवसातील तिसरी बोइंग विमानसेवाही सुरू करण्याचा निर्णय इंडिगो एअरलाइन्सने घेतला आहे. चेन्नईहून शिर्डीसाठी विमानाचे लँडिंग रात्री ९ वाजता आणि पुन्हा चेन्नईला जाण्यासाठी टेकऑफ ९.२० वाजता होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर, दिल्ली- शिर्डी तिसरी बोइंग फ्लाइटही सुरू करण्याबाबत इंडिगो एअरलाइन्सने तयारी सुरू केली आहे. इंदूर - शिर्डी - विशाखापट्टणम ही नवीन फ्लाइटही सुरू झाली आहे.
ही आनंदाची बाब शिर्डी विमानतळावरून नाइट लँडिंगला परवानगी मिळावी यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी स्वत: केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. आता ही सेवा सुरू झाल्याने केवळ शिर्डीकरांसाठीच नव्हे तर नगर जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्राच्या दृष्टीने ही आनंदाची बाब आहे.' - राधाकृष्ण विखे, महसूलमंत्री.
आंतरराष्ट्रीय सेवा सुरू करण्याचा प्रयत्न दिल्लीहून आलेल्या इंडिगोच्या बोइंग विमानाचे नाइट लँडिंग व टेकऑफ यशस्वी झाल्याने आता शिर्डीतून देशांतर्गत रात्रीच्या सेवेचा मार्ग मोकळा झाला. लवकरच शिर्डीसाठी देशभरातून सेवेसोबतच आंतरराष्ट्रीय फ्लाइट सुरू करण्याचा प्रयत्न आहे.' - दीपक कपूर, उपाध्यक्ष तथा एमडी, एमएडीसी, मुंबई.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.