आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते, तेव्हा कधीच आम्ही सत्तेचा गैरवापर वापर केला नाही. मात्र, भाजपचे सरकार आले आणि त्यांनी सत्तेचा गैरवापर सुरू केला. जाणीवपूर्वक विरोधकांना त्रास देण्याचे काम होत आहे. पण हे दिवस लवकरच संपणार असून दीड महिन्यात राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार येईल, असे भाकीत आमदार निलेश लंके यांनी केले.
नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील गावच्या सरपंच, उपसरपंच पदाचा पदभार शुक्रवारी (३ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजता आमदार लंके यांच्या उपस्थितीत झाला. तसेच सरपंच शरद पवार व उपसरपंच जयश्री कोकाटे यांनी पदाचा पदभार घेतला आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, माजी आमदार साहेबराव दरेकर, काँगेस तालुकाध्यक्ष संपत म्हस्के आदी उपस्थित होते.
यावेळी अामदार नीलेश लंके म्हणाले, आमच्याकडे सत्ता असताना मी कधीच कोणाचा राग केला नाही. मी प्रत्येक गावात मोठा निधी दिला, हे गाव माझ्या मतदारसंघात नसताना सुद्धा २० लाख रुपये दिले. आता गावात आमची सत्ता आली आहे. पण राज्यात नाही. पण दीड महिन्यात पुन्हा येऊ शकते, असे भाकीत अामदार नीलेश लंके यांनी केले. राजकीय दबावाखाली चिचोंडी पाटीलच्या सरपंच पद निवडीचा कार्यक्रम पुढे ढकलला जात होता, असा आरोपही आमदार लंके यांनी केला.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे म्हणाले, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक जनतेतून असल्यामुळे आपले सगळे उमेदवारी विजयी होतात, मात्र आपण नगर बाजार समितीच्या निवडणुकीत कमी पडतो. यावेळेस जास्त ताकद लावली, तर बाजार समितीवर सुद्धा आपलीच सत्ता येईल. आपल्याला आपले हक्काचे दोन आमदार आणि घनश्याम शेलार आहेत, या सगळ्यांनी मिळून बाजार समितीला जोर लावला तर बाजार समितीसुद्धा आपल्या ताब्यात येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. समारोपात त्यांनी गावच्या राजकारणाची सगळी परिस्थिती मांडली. प्रवीण कोकाटे यांनी आभार मानले.
--------
आम्ही जे बोलतो, ते करूनच दाखवतो
आम्ही मागील विधानासभा निवडणुकीत ठरवलं होतं की शिवाजी कर्डिले यांना पराभूत करायचे, ते आम्ही करूनच दाखवले आहे. आम्ही जे बोललो ते करून दाखवतोच, आता आम्ही ठरवले आहे घनश्याम अण्णा शेलार यांना आमदार करायचं, ते पण करूनच दाखवणार आहोत, असे यावेळी बोलताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.