आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:रहिवासी क्षेत्रात नव्याने हॉस्पिटल नको ; ​​​​​​​अडचणींबाबत नागरिकांची तक्रार

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सावेडीतील गायकवाड कॉलनी, अर्बन बँक कॉलनी व लॉयड कॉलनी परिसरात तब्बल ७ मोठे हॉस्पिटल असताना, या रहिवासी क्षेत्रात नव्याने होत असलेल्या हॉस्पिटलला परवानगी देऊ नये. या भागात असलेल्या हॉस्पिटलकडून रहिवासी नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे व जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे, पी. आर. कुलकर्णी, बाळासाहेब गायकवाड, हेमंत कोहळे, रविंद्र जेवरे, रविंद्र कुलकर्णी, जयंत रसाळ, अतुल मांजरे, गुलशन बोरा आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते. निवेदनावर मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिकांच्या स्वाक्षर्‍या आहेत. गायकवाड कॉलनी, अर्बन बँक कॉलनी व लॉयड कॉलनी या परिसरात असलेल्या हॉस्पिटलच्या कर्मचार्‍यांची वाहने, रुग्णांच्या नातेवाईकांची वाहने रस्त्यावर उभे असल्याने वारंवार वाहतूक कोंडी होते.

या रहिवासी भागात तब्बल सात मोठे हॉस्पिटल असताना या व्यतिरिक्त महापालिका प्रशासनाकडे सध्या नवीन दोन हॉस्पिटलला परवानगीचे प्रस्ताव दाखल आहे. हे दोन्ही हॉस्पिटल सुरु झाल्यास स्थानिक नागरिकांना हॉस्पिटलची वाहने, रुग्णांच्या नातेवाईकांची वाहने व रुग्णवाहिकांच्या गराड्यातून वाट काढत जाणे अवघड होणार आहे. रात्री अपरात्री वारंवार रुग्णवाहिकेच्या आवाजाने ज्येष्ठ नागरिकांसह परिसरातील नागरिकांची झोप उडाली आहे.

हॉस्पिटल प्रशासन वाहनांच्या पार्किंगचे योग्य नियोजन करत नाही. वाहने रस्त्याच्या मध्ये कुठेही लावली जातात. यातून वाद होतात. त्यामुळे या भागात नवीन होत असलेल्या दोन हॉस्पिटलला स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. त्यामुळे त्यांना परवानगी देऊ नये, वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी या भागात वाहतूक पोलिस नियुक्त करावा, अशी मागणी करत स्थानिक नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...