आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कठोर कारवाईचे संकेत:कर वसुलीत हलगर्जीपणा करणाऱ्या 25 कर्मचाऱ्यांना बजावल्या नोटिसा

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या थकबाकीची अपेक्षित वसुली होत नसल्याने मालमत्ताधारकांवर जप्तीची कारवाई सुरू झाली आहे. त्याबरोबरच वसुलीमध्ये टाळाटाळ करणाऱ्या कामचुकार वसुली कर्मचाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्याचे संकेत आयुक्त पंकज जावळे यांनी दिले आहेत. वसुलीचे प्रमाण कमी असलेल्या २५ वसुली कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

महापालिकेच्या मालमत्ता कर व पाणीपट्टीची थकबाकी १८० कोटींवर पोहचली आहे. महापालिकेने शंभर टक्के शास्ती माफ करूनही सवलतीच्या काळात अपेक्षित वसुली झालेली नाही. लोकअदालती दरम्यान तडजोडीमध्येही मनपाकडून शास्तीमध्ये सवलत दिली जाते. मात्र, त्यालाही अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे मनपा आयुक्तांनी वसुलीचा आढावा घेऊन जप्ती कारवाई सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

वसुलीचे प्रमाण वाढविण्यासाठी कारवाईच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार कारवाईही सुरू झाली आहे. त्याचबरोबर वसुलीच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे. प्रत्येक वसुली कर्मचाऱ्यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला आहे.

यात वसुलीचे प्रमाण कमी असलेल्या २५ कर्मचाऱ्यांना नोटीस बजावून खुलासा मागविण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित वसुली न झाल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे जावळे यांनी सांगितले.दरम्यान, वसुली विभागाचे उपायुक्त सचिन बांगर यांनी प्रभाग अधिकाऱ्यांना थकबाकीदारांवर जप्ती कारवाई सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...