आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चकमक:गडचिरोली पोलिसांशी झालेल्या चकमकीत कुख्यात महिला नक्षलवादी सृजनाक्का ठार

गडचिरोली3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • चकमकीत पोलिसांच्या बाजूने कुठलेही नुकसान झालेले नाही

गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली  तालुक्यातील  सिनभट्टी जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये शनिवारी दुपारी झालेल्या भीषण चकमकीत कुख्यात महिला नक्षलवादी सृजनाक्का ठार झाली.

गडचिरोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी तीन ते साडेतीन च्या दरम्यान ही चकमक झडली. गडचिरोली पोलिसांच्या सी-60 पथकाचे जवान जारावंडी पोलिस मदत केंद्राच्या हद्दतील सिनभट्टीच्या जंगलात मोहिमेवर असताना पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक उडाली. चकमकीत कुख्यात महिला नक्षलवादी सृजनाक्का उर्फ चिनाक्का उर्फ जैनी चैतू (वय 48 रा. गोपनार, लाहेरी) ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

सृजनाक्का ही विभागीय कमिटी सदस्य (डिव्हिजनल कमिटी मेंबर) म्हणून कार्यरत होती. तिच्याकडे दोन दलमची जबाबदारी होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. सृजनाक्का ही 1988 पासून नक्षल चळवळीत होती. सुरुवातीला ती नक्षलवाद्यांच्या भामरागड दलमशी जुळलेली होती. तिच्यावर आतापर्यंत तब्बल 144 गंभीर गुन्हे दाखल आहेत. सरकारने तिच्यावर 16 लाखांचे बक्षीस ठेवले होते. चकमक स्थळावरून पोलिसांनी एक एके-47 रायफलसह भूसुरुंगचे साहित्य मोठ्या प्रमाणात जप्त केले आहे. त्यामुळे नक्षलवादी मोठ्या प्रमाणात घातपाताचा तयारीत होते असा पोलिसांचा दावा आहे आहे. चकमकीत  पोलिसांच्या बाजूने कुठलेही नुकसान झालेले नाही.