आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषद:आता फाईल अधिकाऱ्याकडे जाणार नाही, तर सर्व अधिकारी वॉर रुममध्ये फाईलींवर करणार स्वाक्षरी

नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

२०२४ पर्यंत हर घर, नल से जल या मोहिमेंतर्गत जिल्हाभरात जलजीवन मिशनची कामे सुरू आहेत. जुन्या व नवीन योजनांची उभारणी करताना पाणी योजनांची फाईल संबंधित अधिकाऱ्यांच्या विभागात पाठवली जात होती. फाईलींच्या प्रवासात होत असलेली दिरंगाई समोर येताच, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी जलजीवन मिशनसाठी वॉर रूम तयार केली आहे. त्यामुळे आता फाईली अधिकाऱ्यांकडे पाठवल्या जात नाहीत, तर अधिकारीच या कक्षात जाऊन स्वाक्षरी करतात.

पुढील ३० वर्षांचा विचार करून प्रतिमानसी ५५ लिटर पाणी देण्याचे नियोजन आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेने ९३८ गावांसाठी ९३० योजनांचा आराखडा तयार केला. त्यात जुन्या ६७६ योजनांची रेट्रोफिटिंग तर नवीन २५४ योजनांचा समावेश आहे. योजनांची संख्या व कामाचा व्याप पाहता, प्रत्येक योजनेच्या फाईलीवर विविध स्तरीय अधिकाऱ्यांच्या परवानगीत अधिक वेळ जात आहे. यापार्श्वभूमीवर येरेकर यांच्या संकल्पनेतून, जिल्हा परिषदेत पाणी व स्वच्छता विभागाशेजारी जलजीवनसाठी एक स्वतंत्र वार रूम केली आहे. आता जलजीवन मिशनच्या फाईलवर स्वाक्षरी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, लेखा व वित्त अधिकाऱ्यांसह इतर अधिकारी या कक्षात जाऊन स्वाक्षरी करतात, त्यामुळे योजनांना गती देता येईल.

वॉर रुममध्ये काय चालते?
जलजीवन मिशनच्या वॉर रूम कक्षात तांत्रिक कर्मचारी बसवले आहेत. या ठिकाणी फाईलींची तपासणी तसेच पडतालणीही केली जाते. आता विभाग प्रमुखाकडे फाईल न पाठवता, अधिकारी येऊन, आवश्यक त्या योजनेच्या फाईलवर स्वाक्षरी करून शेरे नोंदवत आहेत. सीईओ येरेकर दररोज कक्षातील कामाचा आढावा घेत आहेत.

‘जलजीवन मिशन’मध्ये राज्यात अकराव्या स्थानी
नगर जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. जलजीवनचा सचिवांमार्फत नियमीत आढावा घेतला जातो. या महत्त्वपूर्ण योजनेच्या कामाला गती देण्यासाठी आम्ही वॉर रूम सुरू केली. या कक्षात माझ्यासह इतर विभाग प्रमुख येऊन स्वाक्षरी करतात. त्यामुळे आता फाईलींचा प्रवास कमी झाला आहे. योजनेला गती मिळाली असून राज्यात आपण अकरा ते बाराव्या क्रमांकावर आहोत.
आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नगर.

बातम्या आणखी आहेत...