आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्व पदे रिक्त:मुळा पाटबंधारे विभागाची कार्यालये व कर्मचारी वसाहत पडली ओस

कुकाणे19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुळा पाटबंधारे कुकाणे उपविभागातील कार्यालये व निवासस्थाने वापराअभावी व पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे भग्नावस्थेत पडली असून शेतकरी प्रशिक्षण केंद्रांच्या इमारतींचीही दुरवस्थेमुळे पडझड सुरू आहे. पाटबंधारेची कोट्यवधीची ही मालमत्ता सद्यःस्थितीत बेवारसपणे धुळखात पडली आहे.मुळा पाटबंधारे विभागाच्या कुकाणे उपविभागात कुकाणे क्रमांक एक व दोन तसेच सलाबतपूर, शिरसगाव, दहिगावने या सिंचन शाखा येतात. यासाठी कुकाणे व लगतच्या चिलेखनवाडीत पाटबंधारे अभियंता, शाखाधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यालये व निवासस्थांनांसाठी इमारती आहेत. मात्र, गेल्या चार-पाच वर्षांपासून ही कार्यालये व निवासस्थांने देखभालीअभावी भग्नावस्थेत पडल्या आहेत. चिलेखनवाडीतील निवासस्थांनाचीही अशीच अवस्था आहे.

कार्यालये व निवासव्यवस्थेच्या भिंती जमीनदोस्त होत आहेत. पाटपाणी आवर्तनाही अभियंते या कार्यालयाकडे फिरकताना दिसत नाहीत. कुकाणे व चिलेखनवाडीत उपअभियंता कार्यालय आहे, तर कुकाण्यात पाटबंधारेची मोठी वसाहत आहे. ही वसाहत आता मरणपंथाकडे वाटचाल करताना दिसू लागली. या वसाहतीतील पाटबंधारेचे साहित्यही चोरीस गेले आहे.

कर्मचारी निवासस्थांनांना गटारीचा विळखा घातला आहे. पाटबंधारेची चिलेखनवाडीतही वसाहत आहे. या सरकारी वसाहतीतील भग्नावस्थेतील खाेल्यात चक्क तीन लाख रुपये किमतीचा २७ किलो गांजा पोलिसांनी जप्त केला होता. त्यामुळे गांजाविक्रीसह जुगार, मटका यासाठीही या सरकारी खोल्यांचा गैरवापर होत असल्याचेही निष्पन्न झाले आहे. याकडे लक्ष द्यायला पाटबंधारे विभागाला लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. कुकाणे उपविभागाच्या पाटबंधारे विभागाची कर्मचारी वसाहत भग्नावस्थेत असल्यामुळे हा फक्त पांढरा हत्ती ठरला आहे, अशी चर्चा सुरू आहे.

कारभार प्रभारीराजवर
कुकाणे उपविभागाकरिता उपअभियंता हे पद आहे. मात्र त्याचाही कार्यभार प्रभारी उपअभियंत्याच्या हाती, तर सर्व पाचही शाखांना ‌अभियंते नाहीत. नेवाशाच्या एका शाखा अभियंत्याकडे कुकाण्याच्या एका शाखेचा प्रभार आहे. बाकी शाखाही बेवारसच आहेत. कुकाणे उपविभागातील सर्व पदे सद्यःस्थितीत तरी रिक्तच आहेत. त्यामुळे या कुकाणे उपविभागावर कोणाचाही अंकुश नाही.

बातम्या आणखी आहेत...