आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत:दमदार पावसामुळे पारनेरमध्ये 10 हजार हेक्टर क्षेत्रावरील वाटाण्याच्या पिकाला जीवदान

अहमदनगर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर तालुक्यात गुरूवारी रात्री आणि शुक्रवारी दुपारी झालेल्या पावसामुळे तब्बल १० हजार हेक्टर क्षेत्रावरील वाटाण्याच्या पिकांना जीवनदान मिळाले आहे. निसर्गाने साथ दिली तर यंदाच्या खरीप हंगामात बऱ्यापैकी उत्पन्न मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यामुळे शेतकरी आनंदले आहेत. या पावसामुळे मूग,बाजरी, सोयाबिन, तसेच मक्यासह इतर चारा पिकांना जीवदान मिळाले.

जलसंधारणाच्या कामांचा फायदा

पारनेर तालुक्याची पावसाची भिस्त पूर्व मोसमी (अवकाळी) पावसावर आहे. मात्र यावर्षी अवकाळी पाऊस फारसा झाला नाही. मृग नक्षत्रही कोरडेच गेले. रोहिणी नक्षत्राने मात्र साथ दिली. रोहिणी नक्षत्रात झालेल्या पेरणीलायक पावसामुळे तालुक्यात खरीप हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली. यात प्रामुख्याने मूग, बाजरी, सोयाबिन, मका, चारा पिके तसेच तालुक्याच्या पठार भागात मोठ्या प्रमाणावर वाटाण्याची पेरणी झाली. गेल्या दोन दिवसांतील पाऊस हा यावर्षीच्या पावसाळी हंगामात सर्वात जास्त पाऊस आहे. यापूर्वी जुलै महिन्यात भीज पाऊस झालेला असल्याने गेल्या दोन दिवसातील पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांमधील ओढे नाले ओसंडून वाहू लागले आहेत. वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या तसेच विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे झालेल्या गावांच्या शिवारात मोठ्या प्रमाणावर पाणी अडले आहे. जलसंधारणाच्या कामांचा या गावांना फायदा झाला असल्याचे चित्र आहे.

पाऊण तासात ५२ मिलीमीटर पाऊस

शुक्रवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास पारनेर शहराला पावसाने झोडपून काढले. पाऊण तासात तब्बल ५२ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद पर्जन्यमापकावर झाली. यावेळी पारनेर-सुपे रस्त्यावर नाईकांची बेंद परिसरातील छोट्या पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहिले. या पावसामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे.

आशा - निराशेचा खेळ

जुलै महिन्यात तीन आठवडे झालेल्या संततधार पावसामुळे खरीप हंगामातील पिके धोक्यात आली होती. सततचा पाऊस व ढगाळ वातावरणामुळे पिकांवर मावा बुरशीसह इतर रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर तण उगवले होते. सततच्या पावसामुळे किटकनाशके फवारणी करणे शक्य झाले नव्हते. या पार्श्वभूमीवर जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर औषध फवारणी, खुरपणी आदी मशागतीची कामे मार्गी लावली. मात्र उन्हाच्या तडाख्याने पिके सुकू लागली होती. त्यामुळे आठ दिवसांपूर्वी संततधार पावसामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा पावसाची प्रतीक्षा होती. गेले दोन दिवस पाऊस झाल्याने खरीप हंगामाच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...