आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानेवासे शहरातील श्रीदत्त मंदिर जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळयाच्या निमित्ताने बुधवारी १ फेब्रुवारी रोजी भगवान श्रीदत्तात्रयांच्या मूर्तीची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी दिगंबरा, दिगंबराच्या जयघोषाने नेवासेनगरी दुमदुमली. नेवासे शहरातील बाजारतळावरील पुरातन भगवान दत्तात्रयांच्या मंदिराचा जीर्णोद्धार श्रीक्षेत्र देवगड गुरुदेव दत्त पिठाचे राष्ट्रीय संत महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.
त्यांच्याच प्रेरणेने येथे त्रिदिनात्मक धार्मिक सोहळयाचे आयोजन करण्यात आले असून बुधवारी श्रीदत्त मूर्तीची पुष्पांनी सजवण्यात आलेल्या रथातून मिरवणूक काढण्यात आली. श्रीरामपूर रोडवरील श्रीखोलेश्वर गणपती मंदिरापासून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला.
मिरवणूक नगरपंचायत चौक, डॉ. हेडगेवार चौक, मारुती चौक, श्रीमोहिनीराज मंदिर, औदुंबर चौक मार्गे काढण्यात आली. या मिरवणुकीचे चौकाचौकात फटाक्यांची आतषबाजी करत तोफांची सलामी देत स्वागत करण्यात आले. मिरवणुकीत सर्व पक्षाचे पदाधिकारी, नागरिक, महिला, तरुण मंडळाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. नेवासे येथील बाजार तळावर असलेल्या श्रीदत्त मंदिर प्रांगणात मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.
यावेळी उपस्थित महिलांनी मूर्तीचे पंचारती ओवाळून औक्षण केले. उपस्थित भाविकांचे त्रिदिनात्मक धार्मिक सोहळा समितीच्या वतीने आभार मानण्यात आले. येथे त्रिदिनात्मक सोहळयात शास्त्रोक्त पद्धतीने धार्मिक कार्यक्रम होणार असून शुक्रवारी ३ फेब्रुवारी रोजी गुरुवर्य भास्करगिरी बाबांच्या हस्ते कलशारोहन करून प्राणप्रतिष्ठा करण्यात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.