आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सीना नदीवर रु. 21 कोटी खर्चाचा नवा पूल; अमरधाम परिसराचा श्वास होणार मोकळा

नगर6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील पहिला उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर वाहतूक कोंडी काही अंशी कमी झाली आहे. शहरातील मुख्य भाग असलेल्या अमरधाम परिसरात होणारी वाहतूक कोंडी देखील भविष्यात कमी होणार आहे. शहरातील अमरधाम परिसरातून जात असलेल्या कल्याण- नांदेड -निर्मल या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या सीना नदीवर राष्ट्रीय महामार्ग विभाग २१ कोटींचा खर्च करून पूल उभारणार आहे. या पुलाच्या खर्चाचे अंदाजपत्रकीय प्रस्ताव मंजुरीसाठी मुंबईतील कोकण भवनात सादर करण्यात आला आहे.

नगर शहर हे राज्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. कल्याण- विशाखापट्टणम हा राष्ट्रीय महामार्ग नगर शहरातून जातो. सध्या काही प्रमाणात बाह्यवळण रस्त्यावरून ही वाहतूक जात असली तरी प्रवासी वाहने मात्र शहरातूनच मार्गस्थ होतात. कल्याण- नांदेड -निर्मल राष्ट्रीय महामार्ग अमरधाम परिसरातून जातो. अमरधाम जवळ असलेल्या छोट्या पुलावरून सध्या वाहनांची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे सणासुदीच्या कालावधीत अमरधाम व या परिसरात वाहतूक कोंडी होते.

पुलाची रुंदी कमी असल्यामुळे एकाच वेळेस दोनच वाहने जाऊ शकतात शिवाय पुलाचीही दुरावस्था झालेली आहे. आता हा पुल नव्याने मोठ्या स्वरूपात तयार करण्यात येणार आहे. या पुलासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने २१ कोटींच्या खर्चाचा प्रस्ताव तयार करून राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या मुंबईतील कार्यालयाला पाठवला आहे. अजून त्याला मंजुरी मिळालेली नाही, मात्र मंजुरी प्राप्त होतात सीना नदीवर हा नवा पूल उभारला जाणार आहे. त्यामुळे सध्या अमरधाम व अन्य परिसरात होणारी वाहतूक कोंडी भविष्यात कमी होणार आहे.

२८ कोटी रुपयांचा खर्च करूनही उखडला महामार्ग
कल्याण- नगर- नांदेड- निर्मल हा महामार्ग नगर शहरातून जात असल्यामुळे नेप्ती पुल ते पाथर्डी रोड (भिंगार) २८ कोटींचा खर्च करून महामार्ग करण्यात आला होता. यात या पुलाचा समावेश नव्हता. मात्र काही दिवसातच हा रस्ता उखडला गेला. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या रस्त्याची पुन्हा दुरुस्ती करण्यात आली होती.

११८ मीटर पुलाची लांबी राहणार
मंजूर वार्षिक आराखडा २०२२- २३ अंतर्गत अंदाजपत्रक मंजुरीसाठी मुंबईतील रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाला सादर करण्यात आलेला आहे. कल्याण- नगर- नांदेड- निर्मल हा ६१ क्रमांकाचा महामार्ग असून, पुलाची लांबी ११८ मीटर आहे तर खर्च २१ कोटी ३१ लाखांचा अपेक्षित आहे.

ऑक्टोबर महिन्यात पुरामुळे १८ तास बंद होती वाहतूक
ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीच्या पावसामुळे नगर शहरातून जाणाऱ्या कल्याण- नगर- नांदेड- निर्मल या महामार्गवरील सीना नदीला पूर आला होता. त्यामुळे पोलीस प्रशासनाला सीना नदीवरील वाहतूक तब्बल १८ तास बंद करावी लागली होती. वाहतूक बंद झाल्यामुळे केडगाव व कल्याण रोड परिसरात राहणाऱ्या नागरिकांना अन्य मार्गाने शहरात यावे लागले होते.

बातम्या आणखी आहेत...