आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • One And A Half Thousand Revenue Workers On Strike For The Second Day In A Row; In Various Departments Of The Collectorate, The Work Of The Office Came To A Standstill Due To Drought, Staff And Strike | Marathi News

आंदोलन:दीड हजार महसूल कर्मचारी सलग दुसऱ्या दिवशीही संपावर; जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांत शुकशुकाट, कर्मचारी, संपामुळे कार्यालयातील कामकाज पडले ठप्प

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विविध प्रलंबित मागण्यासाठी महसूल कर्मचारी संघटनेने सोमवारपासून संप सुरू केला असून, मंगळवारी दुसऱ्या दिवशी हा संप सुरूच होता. नगर जिल्ह्यातील दीड हजार कर्मचारी या संपामध्ये सहभागी झाले आहेत. संपामुळे सलग दुसऱ्या दिवशीही जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाज ठप्प झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभागात मंगळवारी शुकशुकाट होता. दरम्यान एकीकडे वीज टंचाईचे संकट राज्यावर ओढवले असताना या संपामुळे कर्मचाऱ्यांबरोबर अधिकारीही दालनांमध्ये नाहीत, तरी देखील विविध विभागातील दालनांमध्ये वीज व पंखे सुरूच असल्याचे मंगळवारी दिसून आले. संपामुळे मात्र ग्रामीण भागातून जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय कामासाठी येणाऱ्या नागरिकांचे हाल झाले.

नायब तहसीलदार संवर्गातील सरळ सेवा भरतीचे प्रमाण ३३ वरून ३० टक्के करावे, महसूल विभागात रिक्त पदे तातडीने भरावीत, पदोन्नतीची प्रक्रिया तातडीने करावी, नायब तहसीलदार पदाची ग्रेड वाढवावी, नव्या तालुक्यात विविध कामकाजासाठी पदनिर्मिती करावी, प्रत्येक तालुक्यात खनिकर्म निरीक्षकांची नियुक्ती करावी यासह विविध मागण्यासाठी महसूल कर्मचारी संघटनेने सोमवारपासून संप सुरू केला. मंगळवारी देखील कर्मचारी संपावर होते. सलग दुसऱ्या दिवशी संप सुरू असल्यामुळे ग्रामीण भागातून उन्हातानात आलेल्या नागरिकांचे मात्र कुठलेच काम न झाल्यामुळे मोठे हाल झाले. तीच परिस्थिती तहसील कार्यालयातील देखील होती. नगर जिल्ह्यात दीड हजार महसूल कर्मचारी या संपात सहभागी झाले असून, अद्याप संपावर कुठलाही तोडगा निघालेला नाही.

तोडगा न निघाल्याने संपावर ठाम
अनेक वर्षापासून आम्ही सरकारकडे मागण्या करत आहोत. मात्र, त्या पूर्ण होत नाहीत. त्यामुळे आम्हाला संपाचे हत्यार उपसावे लागले. संपाबाबत वरिष्ठ पातळीवर सरकारशी चर्चा सुरू झाली. मात्र, यावर कुठलाही ठोस तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आम्ही संपावर ठाम आहोत. ''भाऊसाहेब डमाळे, जिल्हाध्यक्ष, महसूल कर्मचारी संघटना.

कर्मचारी नसल्याने अधिकारीही सापडेनात जागेवर
संप सुरू असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात कुठल्याच विभागात कर्मचारी नाहीत. कर्मचारी नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांतील अधिकाऱ्यांची दालने सुरू आहेत. मात्र तेथे अधिकारी अनुपस्थित आहेत. त्यामुळे लोकांना चकरा माराव्या लागत आहेत.

बातम्या आणखी आहेत...