आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाटोदा येथील सत्तरवर्षीय आजीबाई कल्पना संचेती यांनी आपल्या संपर्कातील शंभर महिलांची पाच रुपयांची बचत भिशी सुरू केली. या बचतीच्या गोळा झालेल्या पैशातून पाटोदा येथे मुक्कामी येणाऱ्या संत एकनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना चहापाण्याबरोबरच फराळाची व्यवस्था केली जाणार आहे. कल्पना संचेती यांनी वारकऱ्यांच्या सेवेतच पांडुरंग पाहिला असून आता प्रत्येक वर्षी पाटोदा येथील महिला पालखीतील वारकऱ्यांना फराळ देणार आहेत.
पंढरपूरच्या वारीत प्रत्येक जण वारकऱ्यांची सेवा करून त्यांच्यात पांडुरंग पाहत असतो. पाटोदा येथे शंभर महिला पालखीतील वारकऱ्यांना सेवा देऊन सेवेचा संदेश देणार आहेत. कल्पना रिकबचंद संचेती या मूळच्या तालुक्यातील धनगर जवळका गावच्या रहिवासी आहेत. पंधरा वर्षांपासून संचेती कुटुंब पाटोदा येथे वास्तव्यास आहे. शहरात प्रत्येक वर्षी पैठणच्या संत एकनाथ महाराज यांची पालखी मुक्कामी असते. यंदा येत्या २७ जून २०२२ रोजी ही पालखी पाटोद्यात मुक्कामी येणार आहे. आपल्याकडूनही पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांची काहीतरी सेवा घडली तर विठुरायाचीच सेवा केल्यासारखे वाटेल, अशी काही कल्पना असल्यास सांगण्यास त्यांनी सहकारी मैत्रिणींना म्हटले. महिलांनी वारकऱ्यांची सेवा करण्याचे भाग्य सर्वांना घडावे, असा मानस व्यक्त केला यातून कल्पना यांनी पाच रुपये महिना भिशी सुरू केली.
गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून सुरू झालेल्या भिशीत मंगल नागरगोजे, मीरा बांगर, प्रतिभा तांबडे, अनुराधा नागरगोजे, मनीषा सानप, वत्सला राख, राजश्री जायभाय, पष्पा कोठुळे यांच्यासह जवळपास १०० प्रमुख महिलांनी पुढाकार घेऊन भिशी सुरू केली. महिना केवळ ५ रुपये बचत असल्याने या भिशीला प्रतिसाद मिळत गेला. आता वारकऱ्यांसाठी फराळ-चहापाण्याची व्यवस्था केली जाईल.
आम्ही आता प्रत्येक वर्षी सेवा देणार ^आम्हा सर्वांच्या हातून वारकऱ्यांची काहीतरी सेवा घडावी असे वाटत होते. त्यामुळे ही पाच रुपयांची भिशी सुरू केली. याला चांगला प्रतिसाद मिळाला. आता बचतीच्या रकमेतून आम्ही प्रत्येक वर्षी वारकऱ्यांची सेवा करणार आहोत. - कल्पना संचेती, पाटोदा.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.