आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालम्पी चर्मरोगामुळे मृत्यूमुखी पडलेल्या पशुधनाच्या नुकसान भरपाईसाठी निर्माण केलेल्या ऑनलाईन सुविधेमुळे राज्यातील पशुपालकांना दिलासा मिळेल, असा विश्वास पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केला. पशुसहाय्यता ॲप्लीकेशन आणि ऑनलाईन सुविधेचे उदघाटन केल्यानंतर ते बोलत होते. हे शेतकऱ्याचे आणि सर्व सामान्यांचे सरकार आहे, त्यामुळे शेतकरी बांधवाला जलद गतीने आणि विनात्रास नुकसान भरपाईचा अर्ज आणि भरपाईची रक्कम मिळावी, हाच यामागचा उद्देश असल्याचे विखे म्हणाले.
महाराष्ट्रासह राजस्थान, पंजाब, गुजरात, हरियाणा, मध्यप्रदेश आदी राज्यात लम्पी चर्म रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पशुधन बळी पडून शेतकरी बांधवांचे नुकसान झाले. परंतु महाराष्ट्र राज्य सरकारने रोगाच्या सुरुवातीच्या काळातच १०० टक्के लसीकरणाचा निर्णय घेतल्याने पशुधन आजारी पडण्याचे प्रमाण तुलनेने कमी होऊन मृत्यु दरातही घट झाली.
एकंदर लम्पी चर्म रोग प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यात महाराष्ट्र राज्याला यश मिळाले असून विविध प्रभावी उपाययोजनासह लसीकरणामुळे परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली आहे.
या सोहळ्यास पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे उपस्थित होते. राज्यात ३ लाख ९७ हजार २४९ एवढे पशुधन आजारी पडले होते. योग्य उपचारामुळे ३ लाख २० हजार ६७९ पशुधन बरे झाले.
मात्र तरीही ज्या ठिकाणी पशुधन दगावल्याच्या घटना घडल्या, तेथील माहिती घेऊन, त्वरित पंचनामे केलेले आहेत. तसेच २८ हजार २२७ मृत्यू झालेल्या पशुधनाच्या नुकसान भरपाईपोटी आतापर्यंत सुमारे ४१ कोटी ४७ लाख रुपयांच्या नुकसान भरपाईची रक्कम पशुधन पालकांच्या बँक खात्यावर जमा केल्याचे ते म्हणाले. नुकसान भरपाईची रक्कम एक महिन्याच्या कालावधीत थेट पशु पालकांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे.
मात्र प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. शेतकरी त्याचे मोबाईल फोनवरुन पशुसहाय्यता या ॲप्लिकेशनचा वापर करुन अर्ज करु शकतो. तसेच केलेल्या अर्जाच्या मंजुरी प्रक्रियेची माहितीही त्याला समजू शकते. त्यामुळे नुकसान भरपाईकरिता शेतकऱ्यांची ससेहोलपट होणार नाही. पात्र शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विखे यांनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.