आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:पाच वर्षांत अवघ्या 272 दुचाकी निघाल्या भंगारात

बंडू पवार | नगर7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रस्त्यांचा व महामार्गांचा गेल्या पाच वर्षात विस्तार झाला असतानाच नवीन वाहनांची संख्या देखील चार पटीने वाढली आहे. नवीन वाहनांची संख्या वाढली असताना जुन्या वाहनांचे स्क्रॅपिंग भंगार मात्र त्या तुलनेत कमी प्रमाणात झाले आहे. नगरच्या उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयात पाच वर्षात २७२ दुचाकींचे व ५२ चारचाकी वाहनांचे स्क्रॅपिंग करण्यासाठी अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्ज प्राप्तीनंतर या वाहनांचे स्क्रॅपिंग करण्यात आले आहे. यात सरकारी आठ रुग्णवाहिकांचा देखील समावेश आहे.

केंद्र सरकारने १५ वर्ष जुन्या झालेल्या वाहनांच्या स्क्रॅपिंगबाबत धोरण आखले आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी जुन्या वाहनांच्या स्क्रॅपिंग बाबत घोषणा केली होती. सध्या सरकारी स्तरावरील वाहनांच्या स्क्रॅपिंगसाठी हे धोरण असून, सर्वसामान्य नागरिकांसाठी स्वइच्छेने वाहन स्क्रॅप करता येत आहे. नगर शहरासह दक्षिणेतील कर्जत, जामखेड, पाथर्डी, शेवगाव, पारनेर, नगर ,श्रीगोंदे या सात तालुक्यांत २०११ -२०१२ ते २०२१-२०२२ या ११ वर्षात ३७ हजार ९१९ कारची, तर ३ लाख ७४ हजार ९५९ दुचाकीची विक्री झाली आहे.

अकरा वर्षात प्रथमच यंदा सर्वाधिक ४ हजार ६३२ कार विकल्या गेल्या आहेत. अकरा वर्षात कितीतरी पटीने वाहने वाढली असताना त्या तुलनेत जुन्या झालेल्या वाहनांचे स्क्रॅपिंग मात्र अत्यल्प आहे. विशेष म्हणजे यात सरकारी वाहनांसह नागरिकांनी स्वच्छेने स्क्रॅपिंगसाठी दिलेल्या वाहनांचा देखील समावेश आहे. कालबाह्य झालेल्या वाहनांचे स्क्रॅपिंग करण्यासाठी अधिकृतरित्या उपप्रादेशिक परिवहन विभागाची परवानगी लागते.

आरटीओ विभागात स्क्रॅपिंगसाठी अशी आहे प्रक्रिया
सध्या सरकारी स्तरावरील वाहने स्क्रॅपिंग केली जात आहेत. सर्वसामान्य नागरिकांचे वाहन कालबाह्य झाले असल्यास त्याचे स्क्रॅपिंग करता येते. त्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे अर्ज करावा लागतो. अर्ज केल्यानंतर परिवहन विभागाचे निरीक्षक स्वतः येऊन वाहनांच्या इंजिनाची काम करण्याची क्षमता तपासतात. तपासणीनंतर संबंधित अर्जदाराला तसे पत्र दिले जाते. त्यानंतर स्क्रॅपिंगचा चेसी क्रमांक आरटीओ विभागाकडे जमा करावा लागतो.

परस्पर स्क्रॅपिंग केल्यास थेट गुन्हे
नियमानुसार कुठल्याही वाहनचालकाला परस्पर वाहनांचे स्क्रॅपिंग करता येत नाही. वाहनांच्या स्क्रॅपिंगसाठी अधिकृतपणे उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे अर्ज करावा लागतो. निरीक्षकाच्या तपासणीनंतर स्क्रॅपिंगसाठी परवानगी दिली जाते. परवानगी न घेता वाहनांचे स्क्रॅपिंग केल्यास थेट गुन्हा नोंदवण्यात येईल. शिवाय भंगार विक्रेत्यांनी देखील स्क्रॅपिंगसाठी वाहन आल्यास आरटीओचे संबंधित वाहन चालकांकडून पत्र घेणे बंधनकारक आहे.'' उर्मिला पवार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी.

आठ तहसीलदारांची वाहने अनफिट; वाहनांची प्रतिक्षा
जिल्ह्याचे मुख्य प्रशासन असलेल्या तहसीलदारांना व प्रांत अधिकाऱ्यांना देण्यात आलेली १० वाहने अनफिट आहेत. ही वाहने निर्लेखनासाठी दिली असून, यात नगर, कर्जत प्रांताधिकाऱ्यांच्या दोन वाहनांचा तर ८ तहसीलदारांच्या वाहनांचा समावेश आहे. नवीन वाहने खरेदीसाठी ८० लाखांच्या खर्चाचा प्रस्ताव विभागीय आयुक्तालयास पाठवण्यात आलेला आहे. अद्याप त्याला प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही.

बातम्या आणखी आहेत...