आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वास्तव:प्रोफेसर चौकातील व्यापारी संकुलात उरलेत केवळ चारच मूळ गाळेधारक

नगर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनपाच्या प्रोफेसर कॉलनी चौकातील व्यावसायिक संकुलातील गाळ्यांमध्ये केवळ चारच मूळ गाळेधारक आहेत. दोन गाळ्यांत मनपाची व दोन गाळ्यांत महावितरणची कार्यालये आहेत. राहिलेल्या गाळ्यांमध्ये पोटभाडेकरूंचाच दबदबा असल्याचे स्पष्ट झाले आहे. या ३० गाळ्यांव्यतिरिक्त राहिलेल्या गाळ्यांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. मात्र, आता आयुक्त पंकज जावळे यांनी या संकुलाबाबत हालचालींना वेग दिला आहे. गाळे ताब्यात घेण्यासह हे गाळे पाडून नवे संकूल उभारण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.

वेगानेे विकसित होत असलेल्या सावेडी परिसरातील प्रोफेसर कॉलनी चौकातील मनपाचे खूप वर्षांपूर्वीचे गाळे पाडून तेथे भव्य व्यावसायिक संकुल उभारण्याचे मनपाने ठरवले आहे. पण याला या संकुलातील गाळेधारकांचा आणि त्यांना ताकद देणाऱ्या राजकीय मंडळींचा विरोध आहे. प्रोफेसर कॉलनी चौकातील मनपाच्या व्यापारी संकूल ही इमारत जुनी असल्याने महापालिकेने ती पाडून तेथे भव्य व्यावसायिक संकुल उभारण्याचा निर्णय २०१५ मध्ये घेतला. सुमारे ११ कोटी रुपये खर्चून होणाऱ्या या प्रकल्पावर अनेक आक्षेप घेतले गेले होते. संबंधित जागेचे व्हॅल्युएशन चुकीचे काढल्याचेही दावे झाले होते.

त्यावरून राजकीय रणकंदन सुरू असताना दुसरीकडे येथील गाळेधारकांनी महापालिकेच्या व्यावसायिक संकुल उभारणीच्या निर्णयास न्यायालयात आव्हान दिले होते. याची मागील महिन्यात सुनावणी होऊन न्यायालयाने काही गाळेधारकांच्या याचिका फेटाळल्या. तर राहिलेल्या ८ याचिकांची सुनावणी प्रक्रिया सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त जावळे यांनी या संकुलात किती मूळ गाळेधारक आहेत, याची माहिती संकलित केली आहे.

काहींनी भाडे भरले?
सावेडी शॉपिंग सेंटरमधील अनेक गाळेधारकांच्या कराराची मुदतही सुमारे ३० वर्षांपूर्वी संपल्याचे सांगितले जाते. यापैकी काही गाळेधारकांनी मनपाकडे पत्रव्यवहार करून करार वाढवून मिळण्याची मागणीही केली होती. पण त्याचा त्यांनी पुुढे पाठपुरावा केला नाही. मनपा प्रशासनानेही त्यात गांभीर्य दाखवले नाही. या पार्श्‍वभूमीवर या गाळेधारकांपैकी काहींनी त्यांची थकबाकी मनपाकडे भरल्याचे समजते. तसेच काहींनी गाळ्यांची रचना बदलली आहे. ज्या व्यवसायांसाठी मनपाने गाळे दिले होते, ते व्यवसाय बंद होऊन तेथे अनेक मोठे व्यवसाय सुरू झाले आहेत.

प्रोफेसर कॉलनीतील मनपाच्या व्यापारी संकुलात फक्त चारच मूळ गाळेधारक
प्रोफेसर कॉलनी व्यापारी संकुलात मूळ गाळेधारक सचिन शिलवंत यांची सनशाईन गॅलरी आहे. तर नेमीचंद गांधी यांचे दोन गाळ्यांमध्ये शुभम किराणा दुकान आहे. राजेंद्र धोंगडे यांचे साई सर्व्हीस सेंटर आहे. हे चारही गाळेधारक मूळ आहेत. त्यांनी पोटभाडेकरू घातलेले नाहीत. मात्र, अन्य गाळ्यांमध्ये मूळ गाळेधारकांनी पोट भाडेकरू घातले आहेत.

यात भरत कुकरेजा यांनी आकाश खुबचंदानी यांना, दुर्गा कुकरेजा यांनी आकाश खुबचंदानी यांना, प्रदीप सोलट यांनी दोन गाळ्यांपैकी एक आकाश कुलथे व दुसरा मयुर माखिजा यांना, अरुण आडेप यांनी सुनील खंडागळे यांना, रावसाहेब पटवर्धन पतसंस्थेने सचिन शिलवंत यांना, दिगंबर म्याना व संतोष लांडगे यांनी अनिकेत ठकार यांना, नारायण बुंदेले यांनी किशोर बुंदेले यांना, नवनीत सहकारी संस्थेने ज्युस सेंटरला, यशवंत ग्राहक भांडारने रमेश सब्बन यांना, मंदाकिनी गाडीलकर यांनी मनोज बलदोटा यांना, वर्षा वाडेकर यांनी अनिरुद्ध कुलकर्णी यांना, सुनीता परदेशी यांनी दिनेश भाटियांना, अशोक परदेशी यांनी दिनेश भाटियांना, लक्ष्मण हर्दवाणी यांनी दोन गाळे अमित घायतडक यांना, रावसाहेब पटवर्धन पतसंस्थेने हरदीपसिंग कथुरिया यांना, दीपक सासवडे यांनी सुनील थोरात यांना व धैर्यशील वाडेकर यांनी सागर ठाकूर यांना पोटभाडेकरू म्हणून गाळे दिल्याचे मनपाच्या तपासणीत स्पष्ट झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...