आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगरमध्ये आजपासून कलम 144 लागू:शिर्डीतील दहशतवाद्याच्या अटकेनंतर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसलेंचे आदेश

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी येथे पंधरा दिवसापूर्वी एका संशयित दहशतवादीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याला पंजाब पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यात अन्य संशयास्पद व्यक्तींच्या तपासासाठी जिल्हा पोलीसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला दहशतवादी कारवायाच्या पार्श्वभूमीवर 144 कलम लागू करण्याच्या प्रस्ताव पाठवला होता. तो प्रस्ताव जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी मंजूर केला आहे. अशी माहिती अहमदनगरच्या निवासी उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ यांनी बुधवारी दिव्य मराठीशी बोलताना दिली

अहमदनगर ‍जिल्ह्यात आजपासून पासून कलम 144 लागू करण्यात आले आहे. आजपासून पुढील दोन महिने जिल्ह्यात कलम 144 लागू असणार आहे, असा आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दिला आहे.

दहशतवादी कारवायांना प्रतिबंध घालण्यासाठी सुरक्षेचा उपाय म्हणून अहमदनगर ‍जिल्ह्यात आजपासून पासून कलम 144 लागू करण्यात आले आहे. घरमालक, लॉजमालक, सायबर कॅफेचालक/मालक, मोबाईल सिमकार्ड विक्रेते, प्रिटिंग प्रेस/ऑफसेट चालक, विस्फोटक गोदाम परवानाधारक, भंगार विक्रेते व जूने वाहन खरेदी-विक्री करणाऱ्या दुकानदारांसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. संशयास्पद, अनोळखी व्यक्तींची माहिती न लपविता तात्काळ पोलिस प्रशासनाला देण्यात यावी. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस यंत्रणेसह सर्व घटकांनी दक्षता घ्यावी. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी बुधवारी जारी केलेल्या आदेशातून केले आहे.

दहशतवादी कारवायांना प्रतिबंध करण्याबरोबरच सार्वजनिक शांतता अबाधित ठेवणे, दंगलीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार लागू करण्यात आले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील घरमालकांनी, घर भाडेकरूंना भाड्याने घर देतांना भाडेकरुबाबतची सर्व सविस्तर माहिती घेवून त्यांचे ओळखपत्र, (उदा. आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहनचालक परवाना, शासकीय ओळखपत्र) फोटोसह स्थानिक पोलीस स्टेशनला द्यावी. व अहमदनगर पोलिस दलाच्या ahmednagardistpolice.gov.in या वेबसाईटवर सर्व माहिती भरावी. लॉज मालकांनी आपणाकडे येणारे सर्व प्रवाशांची माहिती ओळखपत्रासहित संपूर्ण पत्ता, मोबाईल नंबर घेऊन त्यांची सविस्तर नोंद व सही विहीत नमुन्यातील रजिस्टरला घेऊनच प्रवाशांना लॉज मध्ये प्रवेश द्यावा.

तसेच प्रवाश्यांची घेण्यात आलेली सर्व माहिती रेकॉर्ड 2 वर्षापर्यंत जतन करुन ठेवावे. सायबर कॅफे चालक / मालक यांनी येणारे ग्राहक महिला / पुरुष यांचे ओळखपत्र घेऊन प्रवेश द्यावा. इंटरनेट वापरलेल्या कालावधीची नोंद घ्यावी. एखाद्या संशयीत व्यक्तिस इंटरनेट वापरासाठी देऊ नये. इंटरनेटचा वापर करणारे आक्षेपार्ह वेबसाईटवर सर्च करतात अगर कसे याबाबत सायबर चालकांनी लक्ष ठेवावे. तसेच एखादी आक्षेपार्ह वेबसाइट सुद्धा वापरण्यास / आक्षेपार्ह मजकूर टाकण्यास वेबसाईट वापर करु देऊ नये. मोबाईल सिमकार्ड विक्रेत्यांनी, मोबाईल सिमकार्ड विक्री करतेवेळी सिमकार्ड धारकाचे ओळखपत्र व फोटो घेऊन सिमकार्ड घेणारा तोच आहे किंवा कसे याची खात्री करावी असे आदेशात म्हटले आहे.

दोन महिन्यांसाठी 144 लागू

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 चे आदेश अहमदनगर शहर व जिल्ह्यात पुढील दोन महिन्यासाठी लागू राहतील.असे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी आदेशात नमूद केले आहे.

बातम्या आणखी आहेत...