आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण:पाचपुते यांना विस्कळीतपणा, तरजगतापांना गाफीलपणा भोवणार; तटस्थ राजकीय कुटुंबांशी नागवडेंनी वाढवली जवळीक

श्रीगोंदेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आमदार बबनराव पाचपुते यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्या जनसंपर्काला ब्रेक लागला. २४ तास जनतेत राहणारा नेता म्हणून त्यांची ख्याती होती. पण गेल्या काही दिवसांपासून आलेल्या शारीरिक अडचणीमुळे ते बाहेर पडताना कचरत आहेत. त्यात त्यांचे पुत्र विक्रम हे राजकारणापासून सध्या अलिप्त आहेत, राजकीय वारसहक्कावरून असलेली कौटुंबिक सुंदोपसुंदी पाचपुते गटाला भेदून गेली. ‘थिंक टॅंक’ मधील बहुतांश निकटवर्तीय बाजूला पडले.

या सर्व बाबींचा फायदा पाचपुते यांचे कट्टर विरोधक म्हणून गणल्या जात असलेल्या माजी आमदार राहुल जगताप यांच्या वाटेला आला. पण लोकांना गृहित धरणे आणि त्या दृष्टीने बिनधास्त राहणे हे राहुल जगताप यांना अडसर ठरणार असल्याचे चिन्हे दिसू लागले आहेत. पाचपुते संपलेत हा अविर्भाव आणि नागवडे आपल्या तुलनेत नाहीत या अतिआत्मविश्वासात जगताप यांनी गाफिल राहू नये, असे राजकीय मत जाणकार व्यक्त करू लागले आहेत.

नागवडे करखान्याच्या निवडणुकीत पहिल्या फळीतील सर्व राजकीय विरोधकांनी वज्रमूठ करूनही राजेंद्र नागवडे त्यांना पुरुन उरले. मोडेल पण वाकणार नाही ही बिरुदावली पुढे नेत त्यांनी विरोधकांना फाट्यावर मारले. त्या नंतर राजेंद्र नागवडेंनी आपली ताकद असलेला आर्थिक करिष्मा दाखवायला सुरुवात केली. आता थांबायचं तर नाहीच पण विरोधकांना सुट्टी सुद्धा द्यायची नाही या रितीने त्यांनी पाऊले टाकायला सुरुवात केली आहे.

पाचपुते शांत बसून सगळं पाहत असल्याने त्यांचे कार्यकर्ते हवालदिल आहेत. तर जगताप यांचा दुसरा नंबर हिरावून घेत नागवडे यांनी राजकीय बाजी मारली आहे. नागवडे यांनी आपले सल्लागार सुद्धा बदलले असून त्यांच्याच माध्यमातून तालुक्यातील व्यावसायिक तसेच तटस्थ राजकीय कुटुंबांशी जवळीक वाढवण्यासाठी सुरुवात केली असल्याचे दिसून येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत अनुराधा नागवडे या उमेदवार असतीलच यावर नागवडे गट ठाम आहे. त्या दृष्टीने त्यांनी सुरू केलेल्या मोर्चेबांधणीची धुरा आदेश नागवडे यांच्या खांद्यावर देत राजेंद्र नागवडे यांनी हुकमी एक्का वापरला आहे. राजकीय दृष्ट्या आवश्यक असणारे कौटुंबिक मनुष्यबळ पाचपुते व नागवडे यांच्याकडे जास्त आहे. तसेच राहुल जगताप यांच्याकडेही युवकाचा मोठा ग्रुप आहे तर पाचपुते घरातील सुंदोपसुंदीमुळे त्रस्त आहेत. या सर्व बाबींचा फायदा अप्रत्यक्षपणे नागवडे यांना होताना दिसून येत आहे.

२०२४ ला नव्हे २०२३ लाच चित्र सष्ट करू
विधानसभा निवडणुकीसाठी अजून २ वर्षांचा कालावधी बाकी आहे. २०२४ ला निवडणूक अपेक्षित असली तरी बाशिंग बांधून बसलेले घोड्यावर स्वार झाले आहेत. नागवडेंनी आणलेली हवा त्यांच्याकडे महिला आणि युवा वर्गाला आकर्षित करून गेली. ट्रेलर झालाय अजून पिक्चर व्हायचा आहे असे म्हणणारे नागवडे समर्थक आता २०२४ फार दूर आहे आम्ही २०२३ लाच बऱ्यापैकी चित्र स्पष्ट करू, असे सांगू लागल्याने त्या दृष्टीने नजरा फिरल्या आहेत.

विधानसभेची जगतापांकडून तयारी सुरू
काही झाले तरी २०२४ मध्ये विधानसभा निवडणूक करायची, असा माजी आमदार राहुल जगताप यांच्या सर्थकांचा आग्रह असल्याने तशी तयारीही सुरू केली आहे. डॉ. प्रणोती जगताप आणि माजी राहुल जगताप हे संपूर्ण तालुका पिंजून काढत समर्थकांच्या कार्यक्रमात हजेरी लावत आहेत. युवकांचा मोठा ग्रुप आहे. त्यातच सध्या सेवा संस्था राहुल जगताप यांच्या ताब्यात आल्या आहेत. तसेच बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. जगताप हे थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात असल्याने कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी आमदार जगताप आगामी विधानसभा निवडणूक लढवणारच, असे कार्यकर्ते सांगतात.

बातम्या आणखी आहेत...