आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापैठण-पंढरपूर या राष्ट्रीय पालखी महामार्गाचे काम चालू आहे. पण शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील बोधेगाव, हातगाव, मुंगी, लाडजळगाव, शेकटे या ठिकाणी भूसंपादन करून शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला दिला नाही. यामुळे हातगाव फाटा या ठिकाणी वंचिततर्फे आज रास्ता रोका करून आंदोलन करण्यात आले.
दोन तास रस्ता रोको आंदोलन केले परंतु, आंदोलस्थळी कोणीही जबाबदार अधिकाऱ्यांनी भेट दिली नाही. त्यामुळे आंदोलनकर्ते अधिकच आक्रमक झाले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत आपला रोष व्यक्त केला.
हजारो शेतकऱ्यांसह आत्मदहन करू - प्रा. चव्हाण
अद्यापही शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला मिळाला नसून लवकरच या भागातील बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीचा मोबदला न मिळाल्यास येत्या 26 जानेवारीला हजारो शेतकऱ्यांसह बोधेगाव येथील हातगाव फाटा या ठिकाणी आत्मदहन करणार असल्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांनी दिला आहे.
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे हातगाव फाट्यावर पैठण-पंढरपूर या राष्ट्रीय पालखी महामार्गात गेलेल्या जमिनीचा शेतकऱ्यांना भूसंपादन करून मोबदला मिळावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.
यावेळी वंचित बहूजन आघाडीच्या महिला तालुकाध्यक्ष संगीताताई ढवळे, वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष बन्नूभाई शेख, बोधेगावचे माजी सरपंच रामजी अंधारे, भारतीय जनता पार्टी डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ निलेश मंत्री, अरविंद सोनटक्के, वंचितचे तालुकाध्यक्ष प्यारेलालभाई शेख, सलीम जीलानी, धोंडीराम मासाळकर, शाहुराव खंडागळे, सामाजिक कार्यकर्ते मूनवर शेख, शरद गालफाडे, प्रशांत ढाकणे, संजय भोंगळे, नितीन नाचन, बाळासाहेब गालफाडे यांच्यासह शेकटे, मुंगी, लाडजळगाव, बोधेगाव, हातगाव या गावातील बाधित शेतकरी या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.