आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत १ लाख ३६ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे बाधित १ लाख २१ हजार ६२८ हेक्टर तर सततच्या पावसामुळे बाधित १ लाख ८४ हजार १३५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे पंचनामे पूर्ण केले आहेत.जिल्ह्यात सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत १४९ टक्के पाऊस झाला. २३ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात ७४५.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. खरिपाच्या बहुतांश पिकांची विजयादशमीनंतर काढणी करण्यात येते. परंतु, परतीचा पाऊस लांबल्याने दिवाळीनंतरच काही भागात पिकांची काढणी होऊ शकली.
जिल्ह्यात अतिवृष्टी तर झालीच, शिवाय सततचा पाऊस २३ ऑक्टोबरपर्यंत सुरूच होता. यापार्श्वभूमीवर गाव पातळीवर प्रसासकीय यंत्रणांनी नुकसानीचे पंचनामे केले आहेत. त्यानुसार जून ते सप्टेंबर या कालावधीचा अहवाल अंतिम झाल्यानंतर १ लाख ३६ हजार ६७७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले. ऑक्टोबर महिन्यातील पंचनाम्यांना विलंब होत असल्याने शुक्रवारपर्यंत (११ नोव्हेंबर) पंचनामे सादर करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी जारी केली आहे.
त्यानुसार अतिवृष्टीमुळे १.२१ लाख तर सततच्या पावसामुळे बाधित १.८४ लाख हेक्टरवरील शेतीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनीही एखाद्या क्षेत्राचे अथवा गावाचे पंचनामे राहिले असल्यास त्याची माहिती आपत्ती व व्यवस्थापन मदत व पुनर्वसन शाखेला कळवावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.कृषी विभागाच्या अहवालानुसार जून ते सप्टेंबर या कालावधीत झालेल्या नुकसानीपोटी २९१ कोटींची मदत मागणी नोंदवली आहे. आतापर्यंत ४.२५ कोटी प्राप्त झाले होते. आता ऑक्टोबरच्या अहवालातील नुकसानीचे क्षेत्र स्पष्ट झाल्यानंतर मागणीचा आकडा वाढणार आहे.
शेतकऱ्याचे आर्थिक गणित कोलमडले
शेती मशागत करताना नांगरटखर्च एकरी दोन ते अडीच हजार, रोटावेटर दोन हजार, पेरणी खर्च १ हजार ५००, खुरपणी ७ हजार, खत २ हजार, बियाणे व किटकनाशक फवारणी खर्चासह इतर बाबी पाहता एकरी २५ हजारांवर खर्च आला. अतिवृष्टीमुळे खर्च तर वसूल झालाच नाही, उलट नुकसानच अधिक झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले.
पंचनामे राहिल्यास, तहसीलदारांशी करा संपर्क
काही क्षेत्रावरील पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्याची प्रक्रिया प्रशासनाने राबवली आहे. तथापि, काही पंचनामे राहिले असल्यास, संबंधित शेतकऱ्यांनी तहसीलदारांशी संपर्क साधावा. तसेच तहसीलदारांनीही पंचनाम्याबाबत खात्री करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी केले.
हेक्टरी ५० हजार द्या, अन्यथा रस्त्यावर उतरू
जिल्ह्यात शंभर टक्के शेतीचे नुकसान झाले असून हेक्टरी ५० हजारांची मदत दिली तर शेतकरी उभा राहू शकेल. १५ दिवसांत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाणार आहे. तसेच एकरकमी एफआरपी मिळावा ही आमची मागणी आहे.'' रविंद्र मोरे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.