आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजेश परजणे यांची मागणी:पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून भरपाई द्यावी

कोपरगाव शहर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोपरगाव तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे लाखो हेक्टरवरील खरीप पिकांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक गांवामध्ये प्रचंड प्रमाणात पाणी शिरून घरांचे नुकसान झाले. या नुकसानीचे शासन पातळीवरून तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व गोदावरी खोरे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी केली.

परजणे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन पाठवले. कोपरगाव तालुक्यात ८ सप्टेंबरपासून वादळी वाऱ्यासह आणि विजेच्या कडकडाटासह दररोज पडत असलेल्या पावसामुळे तालुक्याच्या बहुतांशी भागातील पिके भूईसपाट झाली. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला. या नैसर्गिक हानीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याने शासनाने तातडीने या नुकसानीचे पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देणे गरजेचे आहे.

मुसळधार पावसाने कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील सोनेवाडी, पोहेगाव, चांदेकसारे, डाऊच बुद्रूक, घारी, जेऊर कुंभारी या गावांना प्रामुख्याने वादळी पावसाचा मोठा तडाखा बसला. डाऊच येथे वीज पडून जनावरे दगावल्याची घटना घडली आहे. तालुक्यात पूर्व भागातही पावसामुळे शेतातील सोयाबीन, मका, कपाशी, भईमूग, बाजरी, तूर, उडीद, मूग, कांदा रोपे तसेच भाजीपाला पिकांसह ऊसाचे देखील नुकसान झाले. अनेक ठिकाणची शेती पाण्यामुळे वाहून गेली. अनेक ठिकाणी मोठी झाडी, पत्र्याची व मातीची घरे, झोपड्या जमीनदोस्त झाल्या आहेत. काही ठिकाणचे शेतबंधारे फुटल्याने पिकांत पाणी शिरून पिकांचे अतोनात नुकसान झाले. ग्रामीण भागातील रस्ते जलमय झाल्याने दैनंदिन दळणवळणावर विपरित परिणाम झाला. अनेक शेतातल्या केळी, डाळींब, पपई, चिक्कू, पेरू बागा कोलमडून पडल्या. शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. फळबागांसाठी लाखो रुपये खर्च करूनही नैसर्गिक आपत्ती ओढावल्याने शेतकरी हवालदिल झाले. मागील वर्षी अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला असताना बऱ्याच शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळाले नाहीत मागील वर्षीच्या नुकसानची भरपाई अद्याप मिळाली नाही.

बातम्या आणखी आहेत...