आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनोखा उपक्रम:वाचन चळवळ वाढवण्यासाठी परभणी - पुणे 480 किमीचा सायकल प्रवास, अहमदनगरमध्ये वाचक प्रेमींकडून स्वागत

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वाचनाने मेंदू, तर सायकलिंगने आरोग्य सशक्त होते. त्यामुळे समाजात वाचनाविषयी जनजागृती करण्यासाठी परभणी येथील शिक्षक विनोद बबनराव शेंडगे हे परभणी ते पुणे 480 किलोमीटर अंतर सायकलने प्रवास करुन पूर्ण करत आहेत.

वाचन व वृत्तपत्रांच्या कार्यालयाला दिली भेट

अक्षर आनंद वाचन संस्कार केंद्राच्या वतीने घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय अग्रलेख वाचन स्पर्धेचीही जनजागृती ते करत आहेत. या प्रवासात त्यांनी सुमारे 15 ते 20 वाचनालये व वृत्तपत्रांच्या कार्यालयांना भेटी देऊन वाचनाबद्दल जनजागृती केली. औरंगाबादनंतर 4 जून रोजी शेंडगे अहमदनगरमध्ये दाखल झाले. यावेळी अहमदनगर जिल्हा वाचनालयाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.

वाचन चळवळ वाढवण्यासाठी परभणी येथील जिल्हा परिषद शिक्षक विनोद शेंडगे यांनी परभणी येथील शासकीय जिल्हा ग्रंथालय येथून 1 जून रोजी वाचन जनजागृती सायकल प्रवासाला सुरुवात केली. दररोज ते 80 ते 90 किमी अंतर पार करतात. सायकल प्रवासात परभणी, सेलू, परतूर, मंठा, जालना, बदनापूर, औरंगाबाद येथे त्यांनी वाचनालय व वृत्तपत्र कार्यालयात जाऊन वाचनाबद्दल जनजागृती केली. 4 जून रोजी सायंकाळी ते अहमदनगर शहरात दाखल झाले.

अहमदनगर जिल्हा वाचनालयात शेंडगे यांनी वाचकांना मार्गदर्शन केले. यावेळी शिल्पा रसाळ, किरण अग्रवाल, गणेश अष्टेकर, राहुल तांबोळी, ग्रंथपाल अमोल इथापे, उप ग्रंथपाल नितीन भारताल, कुमार गोंटला, संकेत पाठक आदी उपस्थित होते. अहमदनगर येथून रविवारी पहाटे ते पुण्याकडे रवाना झाले. 6 जून रोजी पुणे येथे ते विविध वृत्तपत्र कार्यालयात जाऊन अग्रलेख वाचनाबद्दल जनजागृती करणार आहेत.अहमदनगर पर्यंतच्या प्रवासादरम्यान त्यांनी सुमारे 400 ते 500 जणांशी संवाद साधला.

आतापर्यंत तीन सायकल मोहिमा

शिक्षक विनोद शेंडगे यांनी आतापर्यंत तीन सायकल मोहिमा राबवल्या. यात त्यांनी 1200 किमी प्रवास केला. डिसेंबर 2021 मध्ये परभणी जिल्हा परिक्रमा सायकल मोहिमेत त्यांनी 380 किमी प्रवास केला. यात त्यांनी परभणी जिल्हाभर बालवाचकात जनजागृती केली. गंगाखेड ते नरसी नामदेव 180 किमीची दुसरी सायकल मोहीम 14 मे 2022 रोजी पूर्ण केली. संत विचार वाचो, विवेकी समाजात राहो, हा या मोहिमेचा विषय होता. 1 जूनपासून परभणी ते पुणे 480 किमीचा सायकल प्रवास ते करत आहेत.

सातशे पुस्तकांचा वैयक्तिक संग्रह

माझ्याकडे सातशे पुस्तकांचा संग्रह आहे. कोरोनाच्या लाटेत ही पुस्तके परभणीतील माझ्या कॉलनीतील मुलांसाठी वाचनासाठी खुली करुन दिली. त्यानंतर सायकल रॅलीची कल्पना सुचली. वैयक्तिक छंद जोपासण्यासह या माध्यमातून वाचनाचे महत्त्व सांगतो. सायकल प्रवासात पर्यावरण संवर्धन व आरोग्याविषयी मार्गदर्शन करतो, असे विनोद शेंडगे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...