आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक:पार्थ मंडळाचे अध्यक्ष आव्हाड यांचे आवाहन; तृतीय वर्ष वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना निरोप

पाथर्डी6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वप्रथम जीवनाचे ध्येय निश्चित करा. जे ध्येय साध्य करायचे आहे त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ट करा. आयुष्यात कधी कधी अपयशालाही सामोरे जावे लागू शकते. या विपरित परिस्थितीतही आपल्या ध्येयाचा मार्ग बदलू नका. आयुष्यातील प्रत्येक वळणावर जेव्हा जेव्हा अपयशाला सामोरे जावे लागेल. आपल्या मनगटात स्वप्नांना जिवंत करण्याची ताकद निर्माण करा तुम्हाला निश्चित यश मिळेल, असा संदेश पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड यांनी विद्यार्थ्यांना दिला.

येथील बाबुजी आव्हाड महविद्यालयात तृतीय वर्ष वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे, वाणिज्य विभागप्रमुख डॉ. प्रशांत साळवे, डॉ. भगवान सांगळे, प्रा. विजयकुमार म्हस्के, डॉ. वैशाली आहेर, डॉ. अजयकुमार पालवे, प्रा. आनंद घोंगडे, डॉ. अशोक डोळस, अॅड. राजेंद्र मंत्री, ग्रंथपाल प्रा किरण गुलदगड उपस्थित होते.

आव्हाड म्हणाले, सध्या जग हे विचित्र अशा संक्रमण अवस्थेतून जात आहे. सोशल मीडियामुळे आजची तरुण पिढी आपला वेळ गमावत आहे. याचे सकारात्मक परिणामांपेक्षा नकारात्मक परिणाम जास्त होत आहेत. अपयश आल्यावर मोबाइलच्या आहारी जाऊन आजचे तरुण टोकाचे पाउल उचलताना दिसतात. अशा वेळी शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक तंदुरुस्त असणारा तरुणाच यातून सावरू शकतो म्हणून आपण सर्वांनी येणाऱ्या यश-अपयशाला मानसिकदृष्ट्या खंबीरपणे सामोरे जावे. येणारी एक-दोन वर्षे आपण कठोर मेहनतीत घालवल्यास आपले पुढील जीवन सुखकर होईल.

यशस्वी जीवनाचा आनंद घेत असताना आई वडील व गुरुजनांना विसरू नका. वाणिज्य विभागात करियरच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत. त्या संधीचे सोने करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे हे विसरू नका, असे ते म्हणाले. यावेळी मुकुंद पोटफोडे, अंकिता शिंदे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ प्रशांत साळवे यांनी, सुत्रसंचालन मोरेश्वर तारे व अमृता लोहिया यांनी, तर आभार ऋषिकेश काळे यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...