आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरवणुक:श्रीरामपूर तालुक्यामध्ये शांततेत गणेश विसर्जन ; बेलापुरात विना पोलिस बंदोबस्तात मिरवणूक

श्रीरामपूर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या ! अशा जयघोषात श्रीरामपूर शहरासह तालुक्यात उत्साहात पण शांततेत गणेश विसर्जन पार पडले तर बेलापुरात विना पोलीस बंदोबस्तात विसर्जन मिरवणुक पार पाडली.श्रीरामपूर नगरपालिकेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी अनिल पवार, अतिरिक्त पोलिस अधीक्षक स्वाती भोर, उपअधीक्षक संदीप मिटके, तहसीलदार प्रशांत पाटील, मुख्याधिकारी गणेश शिंदे, पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी नियोजन करून नॉदर्ण ब्रँच, अक्षय कॉर्नर, सरस्वती कॉलनी, काळाराम मंदिर आदी ठिकाणासह इतर ठिकाणी गणेश विसर्जन करण्यासाठी व निर्माल्य गोळा करण्यासाठी व्यवस्था केली होती. यासाठी १८० कर्मचारी कार्यरत होते. श्रीरामपूर नगरपालिकेने मूर्ती संकलनासाठी आठ, तर निर्माल्य गोळा करण्यासाठी पाच वाहने ठेवली होती. नगरपालिकेने २ हजार ६२५ घरगुती तर ७६ मंडळांच्या मूर्ती संकलित केल्या तर सुमारे दहा टन निर्माल्य गोळा केले.

तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आठ पोलीस अधिकारी, सहायक फौजदार दोन, ५७ हवालदार, १० नवप्रविष्ट शिपाई,गृहरक्षक दलाचे जवान ३८ असा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. श्रीरामपूर शहरासह तालुक्यातील अनेक मंडळांनी तसेच शाळा महाविद्यालयानी पारंपारीक वाद्यांच्या गजरात मिरवणुका काढल्या होत्या. दरम्यान बेलापुरात गणेश विसर्जन मिरवणुक पोलीस बंदोबस्ताविना पार पडण्याचा ग्रामस्थांनी निर्णय घेतला होता. त्यानुसार सर्वपक्षीय नेते, सर्वधर्मीय नागरिक सहभागी झाले होते. प्रवरा नदीला पाणी असल्याने श्रीरामपूर शहरासह अन्य ठिकाणाहून गणेश मूर्ती विसर्जनासाठी आल्या होत्या. बेलापूर ग्रामपंचायतीने विसर्जन स्थळी लाईटसह निर्माल्य व गणेश मूर्ती संकलनासाठी चोख व्यवस्था केली होती. कोणताही अनुचित प्रकार न घडता उत्साहात गणेश विसर्जन उत्सव उत्साहात पार पडला.

बातम्या आणखी आहेत...