आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशभरातील लाखो भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथील चौथरा भाविकांना खुला तर झालाच, शिवाय महिलांना प्रथमच तैलाभिषेक करण्याची परवानगी देण्यात आली. विश्वस्तांच्या शनिवारी (१८ जून) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
शनिशिंगणापूर येथे देश-विदेशातील भाविक दररोज मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. पूर्वी सर्व भाविकांना चौथऱ्यावर जाऊन तैलाभिषेक करता येत होता. मात्र, काही वर्षे या ठिकाणी महिलांना प्रवेश बंद करण्यात आला होता. २०१५ मध्ये भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी महिलांना चौथऱ्यावर प्रवेश मिळावा या मागणीसाठी आंदोलन केले होते. त्यानंतर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांनी भाविकांना केवळ पादुकांपर्यंत प्रवेश देण्याचा निर्णय घेतला होता. आता विश्वस्त मंडळाच्या बैठकीत पुरुषांसोबतच महिलांनाही तैलाभिषेक करण्यास प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यासाठी ट्रस्टची ५०० रु. ची पावती घ्यावी लागेल, असे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष भागवत बानकर यांनी सांगितले. त्याची अंमलबजावणी शनिवारपासून सुरू झाली.
रोज हजारो लिटर तेल केले जाते अर्पण
शिंगणापूर येथे शनिदेव स्वयंभू पाषाणरूपात विराजमान आहेत. मूर्ती ५ फूट ९ इंच उंचीची आहे. शनिदेव उघड्यावरच एका चौथऱ्यावर आहेत. या पाषाण शिळेवर कोणताही निवारा नाही. मंदिरात दर्शनाचे नियम अतिशय कडक आहेत. देवदर्शन दिवसातून कोणत्याही वेळेस घेता येते. शनिदेवाला प्रसन्न करून घेण्यासाठी येथे रोज हजारो लिटर तिळाचे तेल अर्पण केले जाते. पुरुष स्नान करून, ओल्या कपड्यांनीच दर्शन घेतात आणि मूर्तीवर तेल अर्पण करून प्रदक्षिणा घालतात. शनी बालब्रह्मचारी असल्याने महिला दुरूनच दर्शन घेत असत. चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यास महिलांना मनाई होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.