आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:मनपा विरोधातील याचिका फेटाळली ; न्यायालयाचा अवमान केल्याचा दावा

नगर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा न्यायालयाच्या निकालानंतर महापालिका अधिकाऱ्यांनी नागरिकांची दिशाभूल करत चुकीची माहिती प्रसिद्धीला देऊन न्यायालयाचा अवमान केल्याचा दावा करणारी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी ही याचिका फेटाळली आहे.कचरा संकलन प्रकरणात महापालिकेची फसवणूक झाल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल झाला. त्यानंतर महापालिकेच्या वतीने वर्तमानपत्रांमधून खोटी माहिती देऊन खुलासा करण्यात आल्याचा दावा करत गिरीश जाधव यांनी अवमान याचिका दाखल केली होती. आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी अनिल बोरगे, घनकचराचे किशोर देशमुख यांच्याविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका दाखल केली होती.

त्यावर प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांच्यासमोर यावर सुनावणी झाली. महापालिकेने घनकचरा व्यवस्थापन प्रमुख देशमुख यांच्यामार्फत गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणात खुलासा केला होता. ठेकेदार, त्यांचे प्रतिनिधी, तत्कालीन अधिकारी स्वतः किंवा त्यांचे सल्लागार सुनावणीस उपस्थित नव्हते. त्यामुळे न्यायालयात या प्रकरणात योग्य बाजू मांडली गेली नाही. कचरा संकलनाची कोणतेही वाढीव बिले देण्यात आलेली नाहीत. चुकीची बिले अदा करण्यात आलेली नाहीत. महापालिकेची कोणतीही फसवणूक झालेली नाही, असा दावा महापालिकेकडून करण्यात आला होता. याला आक्षेप घेत जाधव यांनी अॅड. अभिजित पुप्पाल यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती. मात्र, मनपाच्या वतीने देशमुख यांनी केलेल्या खुलाशात न्यायालयाचा अवमान झालेला नसल्याचे सांगत कोर्टाने ही याचिका फेटाळली आहे.

‘स्वयंभू’ची उच्च न्यायालयात याचिका
स्वयंभू ट्रान्सपोर्टच्या वतीने तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. जिल्हा न्यायालयात मनपाकडून बाजू मांडली न गेल्याने विरोधात निकाल गेला. मनपाची फसवणूक झाली नसल्याचे महापालिका सांगत आहे. कोणताही घोटाळा झाला नाही. त्यामुळे उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याचे स्वयंभू ट्रान्सपोर्टने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...