आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:नगर-मनमाड महामार्गावर रस्त्यावरच केले पिंडदान

राहुरी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर मनमाड राज्य महामार्गावरील राहुरी हद्दीत अपघाताच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी शनिवारी रस्त्यावर पिंडदान करून प्रशासनातील अधिकारी व लोकप्रतिनिधीचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी रस्ता कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी मुंडन देखील केले. राहुरी फॅक्टरीनजिक असलेल्या जुन्या सुतगिरणी समोरील रस्त्यावर शनिवारी सकाळी दशक्रियाविधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. घटनास्थळी दशक्रियाविधीचा तसेच अपघाताच्या घटनात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजलीचा फलक लक्ष वेधणारा ठरला.

गेल्या पंधरवाड्यापासून नगर मनमाड राज्य महामार्गावर राहुरी हद्दीत अपघाताच्या चार घटना घडून सहा लोकांचा बळी गेला आहे. रस्ता दुरूस्तीबाबत आंदोलने करूनही संबंधीत विभागाकडून झालेले दुर्लक्ष अपघाताच्या घटनांना कारणीभूत ठरल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. रस्त्याच्या कामासाठी एकेरी वाहतूक असलेल्या ठिकाणीच अपघाताच्या घटना घडल्याने या धोकादायक रस्त्याचे काम तात्काळ हाती घेण्यात यावे, रस्ता अपघातात मयत झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना व अपंगत्व प्राप्त झालेल्या व्यक्तींना शासनाने मदत करावी, ही मागणी करण्यात आली.

यावेळी अपघाताच्या घटनात मरण पावलेल्या व्यक्तिंना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी देवेंद्र लांबे, वसंत कदम, रवि मोरे, सुरेश निमसे, शरद म्हसे, सतीश घुले, प्रकाश भुजाडी यांच्यासह नागरीक सहभागी झाले होते. यावेळी राज्य महामार्गावर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवलेला होता. रस्ता दुरूस्ती व इतर मागणीचे निवेदन राहुरीचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांना देण्यात आले.

तहसीलमध्ये खड्डे खोदू
नगर मनमाड राज्य महामार्गावर एकेरी वाहतूक सुरु असलेल्या ठिकाणी अपघातच्या घटना वाढल्या आहेत. मात्र अद्याप प्रशासनाकडून दखल घेतली गेली नाही. या धोकादायक ठिकाणचे काम सुरू न झाल्यास राहुरी तहसील कार्यालयाच्या आवारात खड्डे खोदण्याचे आंदोलन छेडले जाईल.'' देवेंद्र लांबे.

बातम्या आणखी आहेत...