आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हागणदारीमुक्त:जिल्ह्यात एक तालुका आणि 101 गावे हागणदारीमुक्त घोषित करण्याचे नियोजन

नगर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आझादी का अमृतमहोत्सव पंधरवड्यात जिल्ह्यात एक तालुका व १०१ गावे हागणदारी मुक्त अधिक गाव घोषित करण्याचे नियोजन आहे. यासाठीची कार्यपध्दती, अॅपवरील नोंदणी, ग्रामसभा ठराव, प्रमाणपत्र याची कार्यपध्दती कार्यशाळेत समजावून सांगण्यात आली, अशी माहिती जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक सुरेश शिंदे यांनी दिली. स्वच्छ भारत मिशन टप्पा २ अंतर्गत गाव हागणदारी मुक्त अधिक (ओडीएफ प्लस) घोषित करण्यासंदर्भातील कार्यपध्दतीची प्रशिक्षण कार्यशाळा जिल्हा परिषद सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. यावेळी सुरेश शिंदे बोलत होते. याप्रसंगी गट विकास अधिकारी डॉ.जगदीश पालवे, डॉ.राधाकृष्ण जगताप, प्रकाश पोळ, समर्थ शेवाळे, महेश डोके, अमोल जाधव, अनिल नागणे, राहुल शेळके, बाळासाहेब कासार, मच्छिंद्र धस, श्रीकांत खरात, किशोर माने आदी उपस्थित होते.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १५ ऑगस्टच्या ग्रामसभेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त गावे हागणदारी मुक्त अधिक जाहीर करून गावात शाश्वत स्वच्छता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

शिंदे म्हणाले, मार्च २०१८ मध्ये जिल्हा हागणदारीमुक्त गाव झाला आहे. आता हागणदारी मुक्त गाव अधिक संकल्पना पुढे आली आहे. यात संपूर्ण गाव व परिसराची स्वच्छता हा उद्देश आहे. यात घनचकरा, सांडपाणी व्यवस्थापन, गावातील शाळा, शासकीय इमारतींमधील शौचालयाची सुविधा व नियमित वापर, प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय व नियमित वापर, गावातील सार्वजनिक ठिकाणी बाहेरुन येणाऱ्यांसाठी सार्वजनिक शौचालयांची सुविधा या सर्व गोष्टींची अंमलबजावणी या संकल्पनेतून करण्यात येत आहे. या सर्व बाबींची अंमलबजावणी झाल्यावर हागणदारी मुक्त अधिक गाव घोषित करण्यात येईल, असे शिंदे म्हणाले.

कार्यशाळेत बिडीओ, विस्तार अधिकाऱ्यांचा सहभाग
या कार्यशाळेत गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी पंचायत, गट समन्वयक, समूह समन्वयक सहभागी झाले होते. विविध तज्ज्ञांनी कार्यशाळेत तांत्रिक मार्गदर्शन केले. प्रशिक्षणानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी तालुकास्तरावर प्रशिक्षण वर्ग घेऊन गावे हागणदारी मुक्त अधिक घोषित करण्याची प्रक्रिया करावयाची आहे.

बातम्या आणखी आहेत...