आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आढावा:शिर्डीत हॉटेल्स, लॉजवर पोलिसांची नजर ; नियम मोडल्यास मालकांवरही गुन्हे नोंदवू

शिर्डीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील हॉटेल, लॉजमध्ये जर वेश्याव्यवसाय चालत असेल तर त्यावर तातडीने कारवाई करून ते हॉटेल, लॉजिंग सिलबंद करण्यात यावेत, असे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक पोलिस प्रशासनाला दिले आहेत. तसेच भाविकांना छळणाऱ्या पाॅलीशवाल्यांचा मुळापासून नायनाट करण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. बुधवारी दुपारी बैठकीत पोलिस अधीक्षक पाटील बोलत होते.

आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र शिर्डीच्या सुरक्षिततेसाठी शहरातील हॉटेल लॉजिंग मालक चालक यांची बैठक बुधवारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव, पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील, वाहतूक कक्षाचे पोलिस निरीक्षक हिरालाल पाटील, सहायक पोलिस निरीक्षक प्रविण दातरे, सहायक पोलिस निरीक्षक संभाजी पाटील, सहायक पोलिस निरीक्षक कोकाटे, हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते.

यावेळी पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी प्रत्येकाची मते ऐकून घेतली. यानंतर पाटील यांनी सांगितले की, येथील हॉटेल इंडस्ट्रीजचे मालक चालक यांचे नुकसान व्हावे, अशी आमची इच्छा नाही. याठिकाणी येणारा भाविक सुरक्षीत असायला हवा. जिल्ह्यात सुरक्षेच्या कारणास्तव कलम १४४ लागू करण्यात आले आहे. हाॅटेलमध्ये येणाऱ्या पर्यटकांची ओळखपत्र घेणे आवश्यक आहे. विमानाने शिर्डीत येणाऱ्या भाविकांचे रेकाॅर्ड तपासणे गरजेचे आहे. भाविकांना चुकीच्या सेवा दिल्या जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. हॉटेल व लॉजमध्ये काम करणाऱ्या कामगारांचे देखील ओळखपत्र किंवा पोलिस व्हेरिफिकेशन दाखला घ्यावेत. हॉटेलमध्ये इंटरनेटद्वारे देण्यात येणारी अनसिक्युअर वायफाय सेवा सिक्युअर करण्यात यावी. परदेशी पर्यटकांचे प्रत्येक हॉटेलमध्ये सी फार्म भरुन घेणे क्रमप्राप्त असून परदेशी पर्यटकांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी. परदेशी पर्यटकांच्या निवासासाठी शिर्डी शहरात अद्यापपर्यंत फक्त चोवीस हॉटेलला मान्यता दिली आहे. सी फाॅर्मची माहिती मिळवण्यासाठी स्थानिक पोलिस प्रशासनाला संपर्क साधावा.

घरमालकांनी भाडेकरुंना भाड्याने घर देताना भाडेकरूंची सर्व माहिती घेऊन पोलीस ठाण्यात द्यावी. सायबर कॅफे चालक मालक यांनी येणाऱ्या ग्राहकांचे ओळखपत्र घेऊन प्रवेश द्यावा. इंटरनेट वापरलेल्या कालावधीची नोंद घ्यावी. वेबसाईटवर आक्षेपार्ह मजकूर टाकण्यासाठी वापर करू देऊ नये. शिर्डी शहरात ही कारवाई निरंतर चालू ठेवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. शहरात गांजा, दारू, नशेची पदार्थांचे विक्री तसेच अवैध धंदे याबाबत माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवू, असे उपविभागीय अधिकारी सातव यांनी सांगितले.

वाहनांची कागदपत्रे तपासा
मुदतबाह्य, व्हिसा संपलेल्या नागरिकांना थारा देऊ नये. प्रत्येक हॉटेल लॉजमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. भाविकांना त्रास देणाऱ्या पाॅलीशवाल्यांवर, वेळप्रसंगी हॉटेल मालकांवरही गुन्हा दाखल करण्यात येईल. यासंदर्भात पोलिसांना सक्त सुचनाही दिल्या आहेत. भाविकांना छळणाऱ्या पाॅलीशवाल्यांचा मुळापासून नायनाट करण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे. वाहनांची कागदपत्रे तपासण्याचे आदेश दिले.

बातम्या आणखी आहेत...