आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेखा जरे हत्याकांड:अकरा दिवसांपासून बाळ बोठे फिरवतोय पोलिसांना गोल गोल; तपासात पोलिस पास, चौकशीत मात्र नापास

नगर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आयफोन घरात ठेवून गुंड, एसटी चालकाच्या मोबाइलचा वापर

सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडातील प्रमुख अटक आरोपी बाळ बोठे स्वतःचा आयफोन घरात ठेवून तब्बल साडेतीन महिने फरार होता. या काळात त्याने रिक्षाचालक आणि एसटी चालकच नव्हे, तर चक्क गुंडाच्या मोबाइलचा वापर करत पोलिसांना गुंगारा दिला. अजूनही तो पोलिसांना खरी माहिती सांगण्यास तयार नाही. त्यामुळे जरे हत्याकांडाच्या तपासात पास झालेले नगर पोलिस बोठे याच्या चौकशीत मात्र सपशेल नापास झाले असल्याचे सध्याचे चित्र आहे.

सामाजिक कार्यकर्ते रेखा जरे यांची ३० नोव्हेंबर २०२० रोजी नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाटात हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना दोन दिवसांत अटक केले. मात्र, गुन्ह्यातील प्रमुख आरोपी बोठे हा साडेतीन महिन्यांपासून फरार होता. त्याला हैदराबाद येथून अटक करण्यात पोलिसांना यश आले. त्याच्या अटकेचा पोलिसांनी मोठा गवगवा देखील केला. पारनेर न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावताच त्याच दिवशी पोलिसांनी त्याला चौकशीसाठी नगरला आणले. गेल्या सात दिवसांपासून दररोज त्याची चौकशी सुरू आहे. वेगवेगळ्या ठिकाणी त्याला नेऊन देखील चौकशी करण्यात आली.

गुन्ह्यातील प्रत्येक स्पॉट तपासण्यात आला. तरीदेखील बोठे पोलिसांसमोर खडा खडा बोललेल्या नाही. पोलिस कोठडी संपताच त्याला पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. जरे हत्याकांडात आणखी काही लोकांचा समावेश आहे. त्यासाठी बोठे याची आणखी चौकशी करणे बाकी आहे, असे कारण पोलिसांनी पारनेर न्यायालयासमोर दिले. न्यायालयाने त्याला पुन्हा तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तरीदेखील बोठे याने अद्याप खरी माहिती पोलिसांना सांगितलेली नाही. उलट तोच पोलिसांना गोल गोल फिरवत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

चलाख बोठे समोर पोलिस हतबल
जरे यांच्या हत्येची सुपारी देणाऱ्या बोठे यानेच जरे यांच्या अंत्यविधीसाठी सर्वतोपरी मदत केली. त्यानंतर दोन दिवसांनी तो पोलिसांच्या हातावर तुरी देत फरार झाला. स्वतःचा आयफोन मोबाइलही त्याने घरी ठेवला होता. मात्र, फरार काळात त्याने स्वतःच्या बुद्धीचा पुरेपूर वापर करत कधी रिक्षाचालक, तर कधी एसटीचालक, तर कधी सराईत गुन्हेगारांच्या मोबाइलचा वापर करत सर्व सूत्रे हलवली. पोलिस मात्र हातावर हात ठेवून साडेतीन महिने त्याचा शोध घेत होते.

बोठेच्या आयफोनचा लॉक अजूनही उघडेना
फरार होताना बोठे याने स्वतःचा आयफोन जाणीवपूर्वक घरी ठेवला होता. पोलिसांनी तो हस्तगत केला. बोठे याला अटक केल्यानंतर पोलिसांनी आयफोनच्या पासवर्डबाबत त्याच्याकडे विचारणा केली. मात्र आपल्याला पासवर्ड आठवत नसल्याचे सांगत बोठे हा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न करत आहे. यावरूनच जरे हत्याकांडाचा तपास लावण्यात पास झालेले पोलिस बोठे याच्या चौकशीत नापास झाल्याचे स्पष्ट होते.

पुढे काय?
कायद्याची पुरेपूर जाण असलेला बोठे चौकशी सुरू असताना पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. न्यायालयाने त्याला सुरुवातीला सात दिवसांची व पुन्हा तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या काळात पोलिसांनी त्याची चौकशी देखील केली. मात्र आता पुन्हा त्याच्या पोलिस कोठडीसाठी पोलिसांना सबळ कारण न्यायालयासमोर सादर करावे लागणार आहे, अन्यथा न्यायालय बोठे याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करेल. न्यायालयीन कोठडी मिळताच बोठे याचा जामीन अर्जासाठीचा मार्ग मोकळा होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...