आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बडगा:शिर्डीत कमिशन एजंटांवर पोलिसांची टाच; पोलिसांच्या कारवाईमुळे एजंटगीरी करणारे गुन्हेगार भूमिगत

शिर्डीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डीत साई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची विविध वस्तू विक्रीच्या माध्यमातून लूट करणाऱ्या एजंटावर शिर्डी पोलिसांनी कायदेशीर बडगा उगारला आहे. या कारवाईने एजंटगिरी करणारे मुख्यतः गुन्हेगार असणारे एजंट भूमिगत झाले आहेत. त्यामुळे शिर्डीत येणारे भाविक हा मोकळा श्वास घेऊ लागले आहेत.

शिर्डी साई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना खोल्या, वाहनतळ, फूल, शाल, प्रसादाच्या नावाखाली कमिशन एजंटगिरी करणाऱ्यांवर शिर्डी पोलिसांनी कारवाई सुरू केली. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी शिर्डीत होत असलेल्या भाविकांची लूट थांबावी यासाठी कठोर कारवाईचे पाऊल उचलण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक मनाेज पाटील यांना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिस उपअधीक्षक संजय सातव, पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी कठोर शास्तीचे नियमन शिर्डीत राबवले आहे. त्यातून भाविकांची लूट करणाऱ्यावर चांगलीच टाच बसली आहे.

पोलिस निरीक्षक पाटील म्हणाले, २७ पासून शिर्डी पोलिसांनी कमिशन एजंटांवर कारवाई सुरू केली आहे. त्यात भिक्षेकरी करणाऱ्या २६ पुरुषांवर कारवाई करण्यात आली. त्यांना विसापूर भिक्षेकरी गृहात पाठवण्यात आले आहे. तर १२ महिला भिक्षेकरी यांना चेंबूर येथे महिला भिक्षेकरी गृहात पाठवण्यात आले आहे. तर १८ कमिशन एजंटांना पकडून राहाता न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

अश्लील हावभाव करणाऱ्या महिलांवरही कारवाई
ही आकडेवारी कमी असली तर पोलिसांच्या कारवाईची कुणकुण आल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीचे मात्र कमिशन एजंट भूमिगत झाले. तर दोन महिलांना ही न्यायालयात हजर करण्यात आले आहे. त्या शिर्डी बस स्थानकावर अश्लील हावभाव करताना आढळून आल्या आहेत. त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई केली आहे. पाटील म्हणाले, यापुढे ही कारवाई सातत्यपूर्ण सुरूच राहणार आहे, त्यामुळे कोणत्याही कमिशन एजंटांवर व भिक्षेकऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...