आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामैदानी चाचणीनंतर पोलिस भरतीसाठी लेखी परीक्षा जाहीर करण्यात आली आहे. चालक पदासाठी २६ मार्च, तर शिपाई पदासाठी २ एप्रिलला लेखी परीक्षा होणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली. मुंबई वगळता पूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी लेखी परीक्षा होत आहे. नगर जिल्हा पोलिस दलातील १० चालक पदासाठी ९३ उमेदवार, तर शिपाई पदाच्या १२९ जागांसाठी १६०६ असे १६९९ उमेदवार पात्र ठरले आहेत. चालक व शिपाई अशा १३९ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. एकूण ११२७८ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ६७०७ उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी हजेरी लावली. ३६६९ उमेदवार गैरहजर राहिले. दोन उमेदवारांनी हजर राहूनही चाचणी देण्यास नकार दिला.
उपस्थित उमेदवारांपैकी ६७२१ उमेदवार जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या चाचणीसाठी पात्र ठरले. त्यापैकी ३२७८ उमेदवार उत्तीर्ण झाले. चालक पदाच्या १० जागांसाठी २१९ उमेदवार उत्तीर्ण झाले, तर शिपाई पदाच्या १२९ जागेसाठी ३०५९ उमेदवार उत्तीर्ण झाले होते. गुणानुक्रमानुसार त्यांना लेखी परीक्षेसाठी पात्र ठरवले गेले आहे. लेखी परीक्षा ९० मिनिटांची व १०० गुणांची असेल. त्याचे स्वरूप ''ऑब्जेक्टिव्ह'' असेल.
परीक्षेवर सीसीटीव्हीचा राहणार वॉच
लेखी परीक्षेचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही. पात्र उमेदवारांना एमएच-आयटीकडून परस्पर हॉल तिकीट उपलब्ध केली जाणार आहेत. ज्या शाळा, महाविद्यालय इमारतीत, खोल्यात सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध आहेत, तेथे परीक्षेची व्यवस्था केली जाणार आहे. अन्यथा प्रत्येक वर्गात स्वतंत्र व्हिडिओग्राफर नियुक्त केला जाणार आहे. मैदानी चाचणीसाठी उपस्थित असलेल्या उमेदवारांचे छायाचित्र व अंगठ्याचा ठसा पोलिसांनी नोंदवून घेतलेला आहे. लेखी परीक्षेसाठी उपस्थित राहणारे उमेदवार तेच आहेत का, याची खातरजमा केली जाणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.