आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप्पाला निरोप:नगरमध्ये पाच तास राजकीय दणदणाट,शिंदे गटाच्या डीजेची घुसखोरी; ठाकरे गटाने थांबवली मिरवणूक

नगर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन वर्षांच्या कालखंडानंतर मोठ्या उत्साहात काढण्यात आलेली श्री गणेशाची शहरातील मुख्य मिरवणूक शिवसेनेतील ठाकरे व शिंदे गटातील राजकीय दणदणटामुळे चांगलीच गाजली. सायंकाळी सातच्या सुमारास शिंदे गटाने पोलिस बंदोबस्त मोडून काढत मुख्य मिरवणुकीत प्रवेश केला. ठाकरे गटाने याला आक्षेप घेत मिरवणूक जागेवरच थांबविली. या राजकीय वादामुळे आडते बाजार - दाळमंडई रस्त्यावर सुमारे तीनशे मीटर अंतरातच तब्बल तीन तास मिरवणूक रेंगाळली. अखेर शिंदे गटाने माघार घेत ठाकरे गटाचा सीडी पुढे येऊ दिल्यानंतर मिरवणूक मार्गस्थ झाली. दरम्यान, रात्री बारापर्यंत विशाल गणपती वगळता मिरवणुकीतील एकाही मंडळाच्या गणपतीचे विसर्जन झाले नव्हते.

जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी सपत्नीक माळीवाडा विशाल गणेश मंदिरात उत्थापन पूजा केल्यानंतर मानाच्या गणपतीची मिरवणूक सुरू झाली. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मानाचा पहिला गणपती दिल्लीगेट वेशीबाहेर पडला. मात्र, त्यानंतर विसर्जन मिरवणूक चांगलीच रेंगाळली. दुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास इतर गणेश मंडळे रामचंद्र खुंट येथून मिरवणुकीत मार्गस्थ झाली. संपूर्ण मिरवणुकीत पहिला मानाचा विशाल गणेश गणपती, त्यानंतरचा संगम तरुण मंडळ, नवजवान तरुण मंडळ व सर्वात शेवटचे आनंद तरुण मंडळ या चार मंडळांनी पारंपरिक वाद्याच्या गजरात मिरवणूक काढली. इतर १२ ते १३ मंडळांनी डीजेच्या दणदणाटात मिरवणुकीत एन्ट्री केली. त्यामुळे सायंकाळी पाच ते रात्री बारा असे तब्बल सात तास मिरवणूक मार्गावर डिजेंचा दणदणाट सुरू होता.

शिंदे गटाचीच घुसखोरी
शिंदे गटाने घुसखोरी करून शिवसेनेच्या गणपतीपुढे त्यांचा गणपती आणला. त्यामुळे आम्ही शिवसेनेचा गणपती जागीच विसर्जन करण्याचा निर्णय घेतला. समझोता, नीलकमल, संगम व अन्य मानाच्या गणपतींनीही आम्हाला साथ दिली व त्यांनीही त्यांचा गणपती जागेवरून हलवणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे अखेर त्यांना माघार घेऊन ठाकरे गटाच्या गणपतीला पुढे येऊ द्यावे लागले. यात वाद झाले नाही. पण घुसख़ोरी त्यांचीच होती, त्यामुळे त्यांना मागे जावे लागले, असे शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम यांनी स्पष्ट केले.

मिरवणुकीत तेराव्या नंबरवरून झाला वाद
विसर्जन मिरवणुकीत मानाचा पहिला विशाल गणपती व त्यानंतर माळीवाडा परिसरातील ११ अशी मानाची १२ मंडळे असतात. त्यानंतर शहर शिवसेनेचे मंडळ तेराव्या क्रमांकावर असते. यंदा शिंदे गटाने या नंबरवर दावा केल्याने वाद निर्माण झाला होता. पोलिसांनी ठाकरे गटाला तेरावा क्रमांक दिला. मात्र, शिंदे गटाने या क्रमांकावर घुसखोरी केल्याने मिरवणुकीत वाद झाला.

“त्या’ दोघांमुळे माघार
शिवसेनेचा डीजे दरवर्षी साडेपाच वाजता आडते बाजारात येतो. तसा यंदाही आम्ही डीजे घेऊन आलो. ठाकरे गटाचा गणपती खूप मागे होता. त्यामुळे आम्ही मिरवणुकीत आलो. आम्ही घुसखोरी केली नाही. ठाकरे गटानेच जाणूनबुजून आम्हाला मिरवणुकीत येता येऊ नये म्हणून उशीर केला. आमच्या पुढच्या माळीवाड्यातील काही गणपतींनीही आम्ही पुढे जाऊ नये, असे प्रयत्न केले. केवळ विक्रम राठोड व अभिषेक कळमकर यांच्या विनंतीला मान दिला व त्यांना पुढे जाऊ दिले, असे शिंदे गटाचे संपर्कप्रमुख सचिन जाधव यांनी सांगितले.

रात्री बारापर्यंत केवळ पहिल्याच गणेशाचे विसर्जन
बंदोबस्त मोडून काढत शिंदे गटाने मिरवणूक एन्ट्री मारली. शिवसेनेने याला आक्षेप घेतल्यामुळे मिरवणूक थांबली. इतर मंडळांनीही शिंदे गटाचा डीजे पुढे येणार नाही, याची काळजी घेतली. परिणामी तेलीखुंट ते आडते बाजार चौक या मार्गावरच सुमारे तीन तास मिरवणूक रेंगाळली. रात्री बाराच्या सुमारास मिरवणूक जागेवरच थांबविण्यात आली व डीजे बंद करून गणपती मंडळे मिरवणुकीतून पुढे मार्गस्थ झाली. नगरच्या इतिहासात प्रथमच रात्री बारापर्यंत मिरवणुकीतील केवळ विशाल गणेशाचे विसर्जन झाले. इतर मंडळांनी मिरवणूक संपल्यानंतर रात्री उशिरा येऊन विसर्जन केले.

दोघांच्या भांडणात राष्ट्रवादी काँग्रेसचा फायदा
ठाकरे व शिंदे गटातील वादात शहर शिवसेनेचीच दरवर्षीची परंपरा मात्र धुळीस मिळाली. दरवर्षी बारा वाजता शहर शिवसेनेचा गणपती नेता सुभाष चौकात आल्यावर तेथेच त्याचे विसर्जन होत असते. पण यंदा माळीवाड्यातील दोस्ती तरुण मंडळाचा गणपती यावेळी नेता सुभाष चौकात होता. दुसरीकडे वादाचा फायदा मात्र राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित आदिनाथ तरुण मंडळाने घेतला. शिवसेनेचे पदाधिकारी वादात व्यस्त असताना आदिनाथ मंडळाने नेता सुभाष चौकात आमदार संग्राम जगताप यांच्या नावाचा जयघोष केला. आता फक्त संग्राम भैय्या असा जयघोष करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...