आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील बाराबाभळी येथील जिल्हास्तरीय इज्तेमात शनिवारी मुस्लिम भाविकांचा जनसागर लोटला होता. जिल्ह्यातील दोन लाखापेक्षा अधिक मुस्लिम भाविकांनी या इज्तेमाला हजेरी लावली. संध्याकाळी उशीरा सामुदायिक दुवाने इज्तेमाची सांगता झाली. अपेक्षेपेक्षा अधिक भाविकांची अलोट गर्दी लोटल्याने संध्याकाळी उशिरा येणाऱ्या भाविकांना पाय ठेवण्यासाठी देखील मैदानात जागा नव्हती. परिसर वाहनांच्या पार्किंगने गच्च भरले होते.
लाखोंच्या जनसमुदायाचे शिस्तबद्ध दर्शन या धार्मिक कार्यक्रमातून दिसून आले. शुक्रवार पहाटेपासूनच या धार्मिक कार्यक्रमासाठी भाविकांचे जथे येत होते. येणाऱ्या भाविकांसाठी चौका-चौकात पाणी, सरबत व अल्पोपहाराचे वाटप सुरु होते. या कार्यक्रमासाठी खिदमत करणाऱ्या युवकांनी काटेकोर नियोजन केले. वजूसाठी ठिकठिकाणी पाण्याचे टँकर, शेततळे व विहिरीच्या पाण्याचे नियोजन करण्यात आले होते. शनिवारी सकाळी मदरसेतील कुरान हाफिज झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. इज्तेमासाठी हजरत मौलाना साद यांचे दोन्ही मुले मौलाना युसूफ व मौलाना सईद प्रमुख म्हणून उपस्थित होते.
सकाळी मौलाना सईद यांचे धार्मिक प्रवचन झाले. संध्याकाळी १८ युवकांचे सामुदायिक विवाह लावून, साध्या पध्दतीने विवाह करण्याचा समाजाला संदेश देण्यात आला. तर मगरीबच्या (संध्याकाळ) नमाजनंतर मौलाना युसूफ यांचे प्रवचन झाले.
या इज्तेमाला विविध पक्षाच्या राजकीय पुढाऱ्यांनी भेट देऊन मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. इज्तेमाच्या नियोजनासाठी सहकार्य करणारे पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन, महावितरण, गाव परिसरातील ग्रामस्थ, युवा स्वयंसेवकांचे मुस्लिम समाजाच्या वतीने आभार मानण्यात आले आहेत.
अल्लाह चरणी मनोभावे दुवा
या प्रवचनात त्यांनी भाईचारा, ईस्लाम धर्माची शिकवण व माणुसकीचा संदेश दिला. रात्री अलोट गर्दीत विश्वशांती, भाईचारा व सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी दुवा करण्यात आली. आमीन... आमीन म्हणत मुस्लिम भाविकांनी अल्लाहचरणी मनोभावे दुवा केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.